नवी मुंबई : विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जवळपास ६० जणांची फसवणूक केल्याचा प्रकार वाशीमध्ये घडला आहे. या प्रकरणी कंपनी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीमध्ये अर्जुन सिंग नावाच्या व्यक्तीने ‘ओशियन वर्ल्ड वेज प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी स्थापन केली होती. विदेशात नोकरी लावून देण्याच्या जाहिराती त्याने विविध ठिकाणी प्रसिद्ध केल्या होत्या. मलेशिया, थायलंड व इतर अनेक देशांमध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. तरुणांकडून व्हिसा व इतर कारणांसाठी ७५ हजार ते एक लाख रुपये घेण्यात आले. ९ जून ते ८ जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. नागरिकांनी पैसे भरले परंतु दिलेल्या वेळेत विदेशात न पाठविल्यामुळे फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शिवाजीनगरमधील रहिवासी अविनाश पोपकळ व इतर जवळपास ६० जणांनी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीचा मालक अर्जुन सिंग पळून गेला आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांची पोलीस चौकशी करत आहेत. (वार्ताहर)
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By admin | Updated: July 10, 2015 03:05 IST