मुंबई : आजवर पोलीस असल्याचे भासवून रस्त्यांवर लूटमार सुरू होती. मात्र आता अल्पवयीन मुलींवर अत्याचारही सुरू झाले आहेत. पंतनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून ही गंभीर बाब समोर आली आहे.काल रात्री पंतनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरल्या अधिकाऱ्यांनी घाटकोपरच्या टिळक रोड परिसरातून सुधीर सोनावणे (२२) या बेरोजगार तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सुधीरने अडवले. मी पोलीस आहे, असे सांगितले. रात्री-अपरात्री मुलींनी एकट्याने फिरू नये, असा सल्ला त्याने या मुलीला दिला. मात्र त्याची एकूण देहबोली, त्याची विकृत नजर पाहून ही मुलगी सुधीरच्या भूलथापांना बळी न पडता तेथून निसटली. तिची पावले घराच्या दिशेने झपझप पडू लागली. काही अंतर कापल्यानंतर सुधीर पाठलाग करतोय, याची जाणीव तिला झाली. थोड्या वेळात सुधीरने तिला गाठले. तिला पुन्हा पोलीस असल्याचे सांगितले. तुझे कोणाकोणासोबत लफडे सुरू आहे, याची पूर्ण माहिती मला आहे. माझ्यासोबत ये नाही तर तुझ्या घरच्यांना सर्व सांगेन, अशी धमकी सुधीर देऊ लागला. या मुलीवर अश्लील शेरेबाजी करू लागला. एव्हाना मुलगी घराजवळ पोहोचली. सुधीर पुढे काही करणार इतक्यात समोरून तिचे आई-वडील आणि भाऊ धावत आले. मुलीला उशीर झाल्याने तेही चिंतेत होते. तिच्या शोधार्थ घराबाहेर पडले होते. मुलगी धावत आपल्या आईला बिलगली आणि तिने सुधीरकडे बोट दाखवून घडला प्रकार सांगितला. तेवढ्यात पंतनगर पोलीस ठाण्याची गस्तीवरली मोबाइल व्हॅन तेथून जाताना मुलीच्या पालकांनी पाहिली. त्यांनी मोबाइल व्हॅन थांबवून पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांना पाहून सुधीरचीही बोबडी वळली. तो पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड विधानातील विविध कलमांनुसार अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास करत असताना टिळक नगर येथील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या गुन्ह्यातला सुधीर फरार आरोपी असल्याची शक्यता पंतनगर पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. शनिवारी टिळक नगर परिसरात घरी एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीला आपण पोलीस असल्याची बतावणी करून तुझ्या वडिलांनी पोलीस भरती संदर्भात पाठविले असल्याचे सांगून या विकृताने बलात्कार करून पळ काढला होता. सुधीर हा विकृत वृत्तीचा असून टीव्हीवरील गुन्हेगारीच्या सीरियल बघून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. त्यानुसार मुंबईसारख्या शहरात रात्री-अपरात्री घराबाहेर एकटे पडणे मुलींच्या जीवाला धोकादायक आहे. त्यात तो अशा रस्त्यावरून एकट्या फिरणाऱ्या मुलींचा पाठलाग करायचा आणि असे फिरणे असुरक्षित असल्याबाबत सल्ले द्यायचा. त्यातही अल्पवयीन मुली त्याच्या टार्गेट होत्या. त्यातही तुमच्या पालकांनीच तुमच्यावर पाळत ठेवल्याचे सांगून त्यांना टार्गेट करत असून तो सराईत आरोपी असल्याचे समोर येत आहे. (प्रतिनिधी)
पोलिसाचा मुखवटा चढवून मुलीचा पाठलाग
By admin | Updated: August 13, 2014 02:09 IST