Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर्णै जेटीची फाईल १० वर्षे शासनदरबारी धूळखात

By admin | Updated: August 24, 2014 22:36 IST

उदासिनता कायम : मच्छिमारांसमोर विविध समस्या कायम

दापोली : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारी व परकीय चलन मिळवून देणाऱ्या हर्णै बंदराची अवस्था दयनीय झाली आहे. येथील मच्छिमार बांधवांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हर्णै बंदरात मच्छिमारी जेटी व्हावी, यासाठी येथील मच्छिमार मागणी करीत आहेत. शासनाने हर्णै बंदराची जेटी मंजूर केली. मात्र, गेली १० वर्षे या जेटीचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे.हर्णै बंदरात दोन नंबरची आर्थिक उलाढाल होते. पारंपरिक बंदरातील मासेमारी बोटींची वाढणारी संख्या, मोठ्या प्रमाणावर बोट ‘लॅण्डिंग’साठी होणारी तारांबळ, बंदरात सुलभ शौचालयाचा अभाव, कोल्ड स्टोअरेज, मच्छीमार्केट, वीज, पाणी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने हर्णै बंदरात मच्छिमारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हर्णै बंदरात तालुक्यातील इतर गावातील बोटी मासेमारी करतात.हर्णै बंदरावर तालुक्यातील मच्छिमार बांधव रोजगारासाठी अवलंबून आहेत. अशा बंदराचा जेटीचा प्रश्न मार्गी लावावा, फयानसारख्या मोठ्या वादळात मच्छिमारांना जीव गमवावे लागले होते. हर्णै येथील समुद्रात वादळ झाल्यास सुरक्षितस्थळी बोटी हलवाव्या लागतात. त्यासाठी आंजर्ले खाडी किंवा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा आधार घ्यावा लागतो. काही वेळा तर समुद्रातील वादळामुळे बोटी सुरक्षित स्थळी न पोहोचल्याने बोट भरकटून अपघातही झाले आहेत.हर्णै बंदरात जेटी नसल्याने मासे समुद्रातून बाहेर काढणे, बोटी लोटणे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. हर्णै बंदरात मच्छी मार्केट नसल्याने मच्छिमार महिलांना पुळणीवर बसून मासेविक्री करावी लागते. काहीवेळेला मासे समुद्रात किनाऱ्यावरील पुळणीवर टाकून लिलाव करावा लागतो, अशा विविध समस्या हर्णैतील मच्छिमारांना भेडसावत आहेत.हर्णै बंदरातील जेटी प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडल्याने या बंदराचे दहा वर्षांपूर्वीचे ४० कोटीचे बजेट १५० कोटी रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे वाढीव खर्चाचा भार शासनाला उचलावा लागणार आहे. (प्रतिनिधी)