Join us

वाशीतील एमजीएमच्या नफेखोरीला बसणार चाप

By admin | Updated: October 8, 2015 23:36 IST

महात्मा गांधी मिशन (एमजीएम) ट्रस्टच्या वाशी येथील रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. इतकेच नव्हे, तर या रुग्णालयावर कायदेशीर

नवी मुंबई : महात्मा गांधी मिशन (एमजीएम) ट्रस्टच्या वाशी येथील रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. इतकेच नव्हे, तर या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सिडकोला दिले आहेत. त्यानुसार सिडकोने सर्व बाबींची पडताळणी सुरू केली असून लवकरच कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात एमजीएमच्या नफेखोरीला चाप बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिजामाता रुग्णालय या नावाने हे रुग्णालय पूर्वी ओळखले जात असे. या रुग्णालयाची स्थिती सुधारण्यासाठी सिडकोने ते महात्मा गांधी मिशन ट्रस्टला भाडेकराराने दिले. करारातील अटीनुसार संबंधित ट्रस्टने हे रुग्णालय ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालविणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात एमजीएमने या कराराचा भंग करीत मनमानी पध्दतीने रुग्णांकडून शुल्क आकारल्याचे स्पष्ट झाले आहे. अटीचे उल्लंघन करून एमजीएम रुग्णालय नफेखोरी करीत असल्याचा आरोप करीत आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने एमजीएमला दणका दिला आहे. तसेच अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून एमजीएम रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. त्यानुसार सिडकोनेही न्यायालयाच्या आदेशानुसार एमजीएम रुग्णालयावर कारवाई करण्याचे संकेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)