Join us

एसटीच्या तिकीट विक्रीचा सावळागोंधळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या बसमध्ये सध्या ईटीआयएम मशीनद्वारे तिकीट देण्यात येते. मात्र कागदी तिकीट देण्याबाबत सोशल मीडियावरून अफवा ...

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या बसमध्ये सध्या ईटीआयएम मशीनद्वारे तिकीट देण्यात येते. मात्र कागदी तिकीट देण्याबाबत सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यात आली होती. त्याबाबत खात्री न करता काही आगारांनी कागदी तिकिटांसाठी प्रशिक्षण सुरू केले असून परिपत्रकेसुद्धा प्रसिद्ध केली आहेत. दरम्यान, एस.टी. महामंडळात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी मशीनद्वारे तिकीट वितरण होणार असल्याचे सांगितले.

अफवेवरून आगार पातळीवर परिपत्रक काढून कागदी तिकीट विक्रीचे प्रशिक्षण घ्या, असे कळविण्यात आले आहे. काही आगारात तर कागदी तिकीट विक्रीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नक्की काय चालू आहे याबाबत वाहक संभ्रमात आहेत. तर कोरोनाचा नवीन व्हेरीयंट डेल्टा प्लस अतिशय घातक असल्याचे म्हटले आहे. अशातच जर जुनी कागदी तिकिटे वाहकांना वापरावी लागली तर तिकिटाच्या ब्लाॅकमधील तिकिटे सुटे करण्यासाठी प्रत्येक वाहक जिभेच्या थुंकीचा उपयोग करतो. कोरोनाचा प्रसार होण्यास मदत मिळेल. कोरोना लाटेमध्ये कागदी तिकिटे वापरण्यात येऊ नयेत. तर सुस्थितीतील दर्जेदार ईटीआयएम मशीन देण्यात याव्यात अशी मागणी काही कर्मचाऱ्यांनी केली आहे.

वरिष्ठांच्या कुठल्याही स्पष्ट सूचना नसताना वाहकामध्ये संभ्रभ निर्माण करणाऱ्या आगार पातळीवरील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

ईटीआयएम मशीन सुरू आहेत. कागदी तिकीट देण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. काही आगारांमध्ये कागदी तिकिटाबाबत प्रशिक्षणाची माहिती नाही. मशीनमध्ये जर बिघाड झाला तर कागदी तिकिटाचा वापर केला जातो. त्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण दिले असल्याची शक्यता आहे.

- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ