मुंबई : मागील दोन आठवड्यांपासून शनिवार, रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार बरसणारा पाऊस ऐन वेळी मात्र विश्रांती घेत आहे. दोन वेळा जोरदार बरसलेल्या पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली असून, ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना उन्हाळ््याचा अनुभव येत आहे. शनिवारी सकाळी पूर्व उपनगरात ठिकठिकाणी शिडकावा करणाऱ्या पावसाने, पश्चिम उपनगरासह शहराकडे पाठ फिरविल्याने बदलते हवामान मुंबईकरांना घाम फोडत आहे.मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत शहरात दोन, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. पूर्व उपनगरात तीन, पश्चिम उपनगरात एक, अशा एकूण चार ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात पाच, पूर्व उपनगरात दोन, पश्चिम उपनगरात चार, अशा एकूण ११ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १ ते ४ जुलैदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. रविवारसह सोमवारी शहर आणि उपनगरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे.
बदलते हवामान फोडतेय घाम; पश्चिम उपनगरासह शहर कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 03:48 IST