Join us

मानधनाच्या मुद्द्यामुळे म्हाडात परिवर्तन

By admin | Updated: September 2, 2015 02:56 IST

एरवी दलाल आणि घुसखोरांच्या विळख्यामुळे हैराण असलेल्या म्हाडाच्या वांद्र्यातील मुख्य कार्यालयात गेल्या पंधरवड्यापासून निवडणुकीची धामधूम होती

मुंबई : एरवी दलाल आणि घुसखोरांच्या विळख्यामुळे हैराण असलेल्या म्हाडाच्या वांद्र्यातील मुख्य कार्यालयात गेल्या पंधरवड्यापासून निवडणुकीची धामधूम होती. प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी सभासद असलेल्या म्हाडा कर्मचारी को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मैत्री पॅनेलने सत्तारूढ सहयोग पॅनेलचा पूर्ण धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळविली. लाखोंचा दैनंदिन भत्ता हा निर्णायक मुद्दा ठरला. ‘मैत्री’चे प्रमुख सूर्यकांत तेली, मोहनराव कोळी व आर.बी. मिटकर यांच्या प्रचार यंत्रणेमुळे तब्बल १० वर्षांनंतर म्हाडा सोसायटीत परिवर्तन घडले.‘सहयोग’चे पॅनेलप्रमुख मधुकर विचारे विजयी झाले असले तरी इतरांचा मोठ्या फरकाने पराभव झाल्याने त्यांना धक्का बसला. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वाटला जाणारा लाखोंचा दैनंदिन भत्ता हे त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. नव्या विजयी पॅनेलने हे मानधन न स्वीकारता सभासदांच्या हितासाठी वापरण्याची ग्वाही दिल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला. एकूण ९५९ मतदान असलेल्या सोसायटीची निवडणूक ४६ वर्षांनंतर पहिल्यादाच रंगतदार ठरली. मोहनराव कोळी यांनी सर्व विरोधकांची एकत्रित मोट बांधून मैत्री पॅनेल उभारून सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोठे आव्हान निर्माण केले. त्यांच्यासह पॅनेलप्रमुख तेली व मिटकर यांनी कुशल नेतृत्वाचा प्रत्यय दिला. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरल्याने त्यांना १०-१ असा एकतर्फी विजय मिळाला. (प्रतिनिधी)