Join us
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढले, डॉक्टरांनी दिला असा सल्ला  

By संतोष आंधळे | Updated: October 10, 2022 22:45 IST

डोळे येणे हा आजार संसर्गजन्य आहे, त्यामुळे एकापासून तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याची शक्यता असते.

मुंबई : गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाल्यामुळे एका बाजूला मुंबईकर सर्दी, खोकल्याने हैराण असतानाच डोळे येण्याची साथ नसली, तरी डोळे येण्याचे प्रमाण वाढत आहे. डोळ्यातून पाणी येणे, लाल होणे, डोळ्यांमध्ये खाज येणे, अशा पद्धतीची लक्षणे काही मुंबईकरांमध्ये दिसत आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या मनाने उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.

डोळे येणे हा आजार संसर्गजन्य आहे, त्यामुळे एकापासून तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात डोळे येणाऱ्या व्यक्तीचा संपर्क टाळावा. डोळे येण्याच्या प्रकरणांत वाढ झाली असून मात्र, त्याला साथीचे नाव आताच देणे योग्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या आठवड्यापासून या डोळे येण्याचे रुग्ण रुग्णालयात दिसून आले. एकदा व्यक्तीला डोळ्याचा संसर्ग होऊन गेला आणि त्यांनी काळजी घेतली नाही, तर त्यांना पुन्हा डोळ्याचा संसर्ग होऊ शकतो. डोळे आल्यास ते स्वच्छ पाण्याने धुवावेत, तसेच डोळ्यांना सतत हात लावू नये. रुमालाने डोळे चोळत बसू नये. घरातील अन्य सदस्यांपासून लांब राहावे, तसेच डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलेही औषध स्वतः विकत घेऊन टाकू नये.

या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी सांगितले की, डोळ्याची साथ आली, असे सांगता येणार नाही. काही प्रकरणे डोळे आल्याची असू शकतात. आम्ही आवाहन करत आहोत की, त्यांनी या आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तर जे.जे. रुग्णालयाचे वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितले की, डोळे येण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, साथ वगैरे काही पसरलेली नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी, लहान मुलांना डोळे आले असतील, तर पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये, तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :मुंबईडॉक्टर