Join us  

एकांकिकांचे नियम व अटी बदला; लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांची आयोजकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 7:31 AM

देशपांडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, एकांकिका स्पर्धा हे मराठी रंगभूमीचे मोठे बलस्थान आहे.

- संजय घावरेमुंबई : सप्टेंबर उजाडला की एकांकिका स्पर्धांचा हंगाम सुरू होतो. सगळे हौशी प्रायोगिक रंगकर्मी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कंबर कसतात. मोठ्या मेहनतीने स्पर्धांमध्ये भाग घेतात; पण काही नियम व अटी कलाकार व यशाच्या आड येतात. हेच नियम आता काळानुरूप बदलण्याची गरज असल्याचे मत लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.  

देशपांडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, एकांकिका स्पर्धा हे मराठी रंगभूमीचे मोठे बलस्थान आहे. इथे नवोदित कलाकार-तंत्रज्ञ तयार होतात. त्यामुळे या स्पर्धा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असाव्यात. त्यांना अटी व नियमांमध्ये अडकवून त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नवोदितांकडून चांगले सादरीकरण व्हावे, त्यातून शिकायला मिळावे हा स्पर्धांचा हेतू असतो. पण, बऱ्याच स्पर्धांमध्ये अटी व नियमांचे पालन करतानाच त्यांची दमछाक होते. 

हे बदल अपेक्षित...

 नवीन एकांकिकेसाठी लेखकाला तात्पुरत्या सेन्सॉर सर्टिफिकेटवर एकांकिका करण्याची परवानगी द्यावी. प्राथमिक व अंतिम फेरीचा कालावधी कमी असल्याने कायमस्वरूपी सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवणे अवघड जाते. लेखक हयात नसलेल्या पूर्वी अनेक स्पर्धांमध्ये सादर झालेल्या, पुस्तकात छापून आलेल्या जुन्या एकांकिकांचा डीआरएम क्रमांक ग्राह्य धरावा. कारण त्यांचे सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवणे खूप अवघड किंवा अशक्यच असते. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा वगळता इतर खुल्या स्पर्धांमध्ये एका कलाकाराला अनेक एकांकिकांमध्ये अभिनयाची मुभा असावी. जर एका लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या, तंत्रज्ञांच्या एकाच स्पर्धेत अनेक एकांकिका असू शकतात, तर कलाकारांनाही ती असावी. कुठल्या भूमिकेला बक्षीस द्यायचे हे परीक्षक ठरवतील.  अंतिम फेरीत  नेपथ्य लावणे, प्रकाशयोजना करणे आणि सादरीकरणाला केवळ एक तास दिला जातो. शक्य असेल त्या आयोजकांनी ही वेळ वाढवावी. निकालानंतर परीक्षकांनी स्पर्धक कुठे कमी पडले व त्यांच्यात आणखी काय सुधारणा व्हाव्यात हे संवाद साधून सांगावे. 

अटल करंडक, कल्पना एक आविष्कार अनेक, कणकवलीतील नाथ पै अशा महाराष्ट्रात लहान-मोठ्या जवळपास २०० ते ३०० स्पर्धा होतात. यात अंदाजे हजार संस्था सहभागी होतात. त्यातून ५००० कलाकार आणि १००-२०० तंत्रज्ञ घडतात. सप्टेंबरपासून जानेवारी अखेरपर्यंत स्पर्धांचा हंगाम असतो. २६ जानेवारीला सवाई एकांकिका स्पर्धा शेवटची होते.

टॅग्स :मराठी साहित्य संमेलन