मुंबई : मुंबई विद्यापीठातील हंगामी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने सोमवारी, २७ नोव्हेंबर रोजी ‘चड्डी बनियान आंदोलना’ची हाक दिली आहे. या आंदोलनात पुरुष सुरक्षा रक्षक चड्डी आणि बनियानव्यतिरिक्त कोणतेही वस्त्र परिधान करणार नसून, महिला सुरक्षा रक्षक काळ्या रंगाच्या फिती लावून विद्यापीठ प्रशासनाचा विरोध करणार आहेत.येथील सुरक्षा रक्षकांना अनेक वर्षांपासून गणवेश, सार्वजनिक व नैमेत्तिक रजा, महिला सुरक्षा रक्षकांसाठी गणवेश बदलण्यास कक्ष, अतिरिक्त कामाचा भत्ता, धुलाई भत्ता, रात्रपाळी भत्ता, प्रवास भत्ता अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत.या प्रकरणी आधीच्या कुलगुरूंनी द्विसदस्यीय समिती नेमून संघटनेशी चर्चाही केली होती. मात्र, त्याला २ वर्षे उलटल्यानंतरही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
मुंबई विद्यापीठात ‘चड्डी-बनियान आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 06:14 IST