Join us

चाणक्यनीतीपुढे राष्ट्रवादी हतबल

By admin | Updated: May 11, 2016 02:20 IST

महापालिकेच्या २१ वर्षांच्या वाटचालीमध्ये गणेश नाईक व त्यांच्या पक्षाला विरोधकांनी पहिल्यांदाच जबर झटका दिला आहे. राष्ट्रवादीने सभापतीपद टिकविण्यासाठी टाकलेले सर्व डावपेच त्यांच्यावरच उलटले.

नवी मुंबई : महापालिकेच्या २१ वर्षांच्या वाटचालीमध्ये गणेश नाईक व त्यांच्या पक्षाला विरोधकांनी पहिल्यांदाच जबर झटका दिला आहे. राष्ट्रवादीने सभापतीपद टिकविण्यासाठी टाकलेले सर्व डावपेच त्यांच्यावरच उलटले. शिंदे, विचारे, म्हात्रे यांच्या राजकीय डावपेचांना नाहटांच्या प्रशासकीय कोशल्याचे बळ मिळाल्याने सत्ताधाऱ्यांना पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. स्थायी समिती सभापती निवडणुकीमध्ये सेना - भाजपाने राष्ट्रवादीवर केलेल्या कुरघोडीची चर्चा शहरात सर्वत्र सुरूच आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून गणेश नाईक यांनी सत्ता स्वत:कडे ठेवली आहे. कसोटीच्या प्रसंगामध्येही राजकारणामधील सर्व प्रकारच्या खेळी व डावपेच वापरून विरोधकांना नामोहरण केले. पहिल्यांदाच पालिकेच्या राजकारणामध्ये मोठा सेटबॅक बसला आहे. २ मेपूर्वी स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे जाईल, असे कोणालाच वाटले नव्हते. परंतु राष्ट्रवादीच्या सदस्या अपर्णा गवते यांना पक्षश्रेष्ठींनी अचानक राजीनामा देण्यास सांगितले व राजकीय हालचालींना वेग आला. गवते यांचे नगरसेवकपद निवडणुकीच्या अगोदर रद्द करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवले जाण्याची शक्यता वाटल्याने हे राजीनामा नाट्य घडविले. नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी तत्काळ १० मे रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. परंतु कोकण आयुक्तांनी ९ मे रोजी सभापती निवड ठेवल्याने सभाही त्याच दिवशी ठेवली. आमदार मंदा म्हात्रे यांनी नियमबाह्यपणे सभा होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याला स्थगिती मिळविली. काँगे्रसच्या नगरसेविका मीरा पाटील यांचे मत निर्णायक होणार असल्याने शिवसेना व भाजपा नेत्यांनी काँगे्रसचे संतोष शेट्टी व इतरांशी संपर्क वाढविले. यापूर्वी नाईकांनी दिलेल्या त्रासाचा बदला घेण्याची हीच वेळ असल्याचे पटवून देत मत देण्यास प्रवृत्त केले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे तोडफोडीच्या राजकारणामध्ये माहीर असल्याचा फायदा युतीला झाला. खासदार चार दिवस शहरात ठाण मांडून बसले होते. आमदार मंदा म्हात्रे यांनीही यामध्ये पुढाकार घेतला व या राजकीय डावपेचांना सेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या प्रशासकीय कौशल्याचे बळ मिळाले. याशिवाय यापूर्वी नाईकांकडे असताना अशाप्रकारचे प्रसंग हाताळण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे विजय चौगुले, एम. के. मढवी हे सेनेत असल्याने त्याचा मोठा फायदा झाला. मढवी पायाला भिंगरी लावून नेत्यांसोबत फिरत असल्याचे पाहावयास मिळत होते. विरोधकांच्या टीम वर्कपुढे गणेश नाईक व त्यांची टीम हतबल ठरली. काँगे्रसच्या एक मताच्या बळावर सेनेचे शिवराम पाटील विजयी झाले व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे चेहरेचे उतरले. या घटनेचे पडसाद आता शहरात अजून काही दिवस उमटत राहणार आहेत. > स्थायी समिती सभापती निवडीचा घटनाक्रम२ मेला अपर्णा गवते यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला.५ मे रोजी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी विशेष सभेची मागणी केली.सचिवांनी १० मे रोजी विशेष सभेचे आयोजन केले.९ मे रोजी सभापती निवड घेण्याचे कोकण आयुक्तांचे पत्र १० मे रोजीची विशेष सभा रद्द करून ९ मे रोजी घेण्याचे ठरविले.७ मे रोजी शासनाने विशेष समितीचा निर्णय निलंबित केला. शिवसेना-भाजपा नेत्यांनी काँगे्रसच्या संतोष शेट्टी व इतरांशी संपर्क साधण्यास सुरुवात७ मेपासून खासदार राजन विचारे शहरात तळ ठोकून बसले.राष्ट्रवादीचे सर्व डावपेच त्यांच्यावर उलटविण्याची रणनीतीमीरा पाटील युतीच्या नेत्यांच्या संपर्कात रविवारी काँगे्रस नेत्यांचे मत परिवर्तन होऊन राष्ट्रवादीला मतदानाचा निर्णय शिवसेना व भाजपा नेत्यांनी काँगे्रस पदाधिकाऱ्यांना समजावण्यासाठी धावपळ सोमवारी पहाटे मीरा पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भेट संदीप नाईक यांच्या कारमधून मीरा पाटील पालिका मुख्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.नवीन सदस्य प्रकाश मोरे यांना मतदान करता येणार नसल्याचे स्पष्टमीरा पाटील यांनी शिवसेना सदस्यांना मत देऊन राष्ट्रवादीला झटका दिला