Join us  

अभिमानाने सांगू शकाल असा प्रकल्प राबवा; मनपा आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 9:42 AM

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भविष्यातील आपली कार्यपद्धती कशी असेल याची चुणूक दाखवून दिली आहे.

मुंबई :मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भविष्यातील आपली कार्यपद्धती कशी असेल याची चुणूक दाखवून दिली आहे. विविध प्रकल्प-योजना,  महत्त्वाची कामे, त्यात येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींचे निराकरण करतानाच कोणत्या नव्या संकल्पना राबवता येतील यादृष्टीने आखणी करण्यासाठी आयुक्त प्रत्येक महिन्याच्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. अभिमानाने सांगू शकाल, असा  एक तरी प्रकल्प अधिकाऱ्यांनी राबवावा, अशा शब्दात आयुक्तांनी अधिकाऱ्यांपुढे नवे चॅलेंज ठेवले.

याबाबत पहिली बैठक आज पार पडली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह विविध सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध खात्यांचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसंवाद वाढविणे गरजेचे-

१)  नागरी सेवा-सुविधांशी संबंधित प्रश्न हे नागरिकांशी संबंधित असतात. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवणे गरजेचे आहे. नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणे,  त्यांच्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आवश्यक आहे. पालिकेतील विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहन आयुक्तांनी बैठकीत केले.

गुंतागुंतीचे प्रश्न वरिष्ठांसमोर आणावे-

१) प्रशासनातील ज्या-ज्या विभाग- खात्यांकडे प्रलंबित, गुंतागुंतीचे वा अन्य कोणतेही प्रश्न असतील, तर ते वरिष्ठांसमोर आणावेत. प्रश्न, अडचणी तुंबून राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. असे प्रश्न, अडचणी यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यावर भर देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

२) आयुक्तांनी पालिकेच्या १५० वर्षाच्या इतिहासाचा, मुंबईचा नावलौकिक वाढवण्यात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेत, सध्याच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. 

३) त्या कार्यकाळात तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय, राबविलेल्या अभिनव प्रकल्पांमुळे पालिकेचा नावलौकिक आहे. संबंधित प्रकल्प उभारणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांचे नाव आजही स्मरण केले जाते. 

४) याच धर्तीवर विद्यमान अधिकाऱ्यांनी किमान एकतरी असा अभिनव प्रकल्प सुरू करायला हवा,  जो दीर्घकाळ टिकेल, दूरदृष्टीचा प्रकल्प म्हणून ओळखला जाईल, जेणेकरून निवृत्तीनंतर आपण अभिमानाने सांगू शकलो पाहिजे की, हा प्रकल्प आपल्या कार्यकाळात राबवला गेला, अशा शब्दात आयुक्तांनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले.

टॅग्स :मुंबईनगर पालिका