Join us  

अहिरांच्या पक्षांतराने एमआयएमसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 2:03 AM

वरळी नव्हे, तर भायखळ्यातून लढणार

गौरीशंकर घाळे मुंबई : सचिन अहिर यांनी वरळीऐवजी भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने एमआयएमचे विद्यमान आमदार वारिस पठाण यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. अहिर यांनी शिवबंधन बांधल्याने भायखळा मतदारसंघावरील शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. युतीच्या जागावाटपात भाजप या जागेवर दावा करणार नसल्याचे समजते.अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वरळीतील शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचे काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यातच शिंदे यांनी वरळीचा पुढचा आमदार मीच असेन, असे वक्तव्य केल्याने तर्कवितर्क मांडण्यात येत होते. अहिर यांच्या प्रवेशामुळे अंतर्गत संघर्ष निर्माण होईल, अशीही शंका व्यक्त केली गेली. मात्र, त्यांच्यामुळे वरळी विधानसभेत संघर्ष होणार नसून शेजारील भायखळा मतदारसंघात सेनेचा मार्ग प्रशस्त झाला आहे. याची स्पष्टता आल्याने विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्यासह वरळी भागातील किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, आशिष चेंबूरकर आदी प्रमुख नेत्यांनी आवर्जून अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाप्रसंगी ‘मातोश्री’वर हजेरी लावली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अहिर वरळीतून अपयशी ठरले होते. मात्र, त्याआधी सलग चार टर्म ते आमदार होते. सर्वप्रथम १९९९ मध्ये आणि नंतर २००४मध्ये अहिर शिवडी मतदारसंघातून विजयी झाले. पुढे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी वरळी मतदारसंघाची निवड केली.त्यांचा भायखळयातही संपर्क आहे. त्यांना येथून उमेदवारी दिल्यास अखिल भारतीय सेनेचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय सेना, भाजपकडे मोठे नाव नाही. त्यामुळे २००९, २०१४ मध्ये काँग्रेस त्यापाठोपाठ एमआयएम येथे विजयी झाली. २०१४ च्या निवडणुका सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्र लढविल्या. त्यात भाजप १५, सेना १४ अशा मुंबईतील २९ जागा आता युतीकडे आहेत. या २९ ठिकाणी ज्याचा आमदार त्याची जागा असा फॉर्म्युला युतीत ठरल्याची चर्चा आहे. भायखळ्यात गेल्या वेळी एमआयएमचे वारिस पठाण विजयी झाले होते. भाजपचे मधू चव्हाण दुसऱ्या तर काँग्रेसच्या मधू चव्हाणांना तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.

टॅग्स :शिवसेनाऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन