संदीप प्रधान- मुंबईआगामी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांची निवडणूक स्वबळावर जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच व्यूहरचना आखली असून, भाजपाच्या या हालचालींचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्यात कसा समाचार घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवून ‘शत प्रतिशत भाजपाचा’ नारा भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी दिला आहे. आॅक्टोबर महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक असून, भाजपाने शिवसेना व मनसेमधील प्रभावी असंतुष्टांना लागलीच भाजपात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महापालिका वॉर्डात भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही तेथे शिवसेना, मनसेला खिंडार पाडण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. एलईडी लाईट बसवण्याच्या प्रस्तावावरून शिवसेना-भाजपात वाद झाले. शिवसेनेला मलिदा न मिळाल्याने ते विरोध करीत असल्याची भूमिका महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी जाहीरपणे घेऊन थेट ‘मातोश्री’वर चिखलफेक केल्याची शिवसेनेची भावना झाली आहे. मालमत्ता कर आकारणीच्या पद्धतीवरूनही भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पद्धतीने रिलायन्सच्या ‘४जी’करिता करायच्या कामाला आता अचानक भाजपाने विरोध केला आहे. यापूर्वी या विषयावर एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपाची भूमिका परस्पर विरोधी आहे.शिवसेनेच्या मराठीच्या मुद्द्याला शह देण्याकरिता सध्या भाजपाचे नेते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मराठीबाबत अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. मराठीचा मुद्दा शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेसमोर भाजपाच्या आक्रमणाचे आव्हान
By admin | Updated: January 23, 2015 02:12 IST