ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना सर्वपक्षीयांनी चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आव्हाडांनी हे चक्रव्यूह भेदून तब्बल ४४ हजार ७१५ मतांची आघाडी घेऊन शिवसेनेचे दशरथ पाटील यांचा पराभव केला़ एमआयएमला येथे तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून मनसेच्या उमेदवाराचे येथेही डिपॉझिट जप्त झाले आहे. ठाण्यातील तीन मतदारसंघांबरोबरच मुंब्रा-कळव्याच्याही मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी विधानसभा निवडणूक लागण्याआधीच शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी चक्रव्यूह आखले होते. या चक्रव्यूहात आव्हाड अडकल्याचा काहीसा भासही या मतदारसंघात निर्माण झाला होता. मुंब्य्रातील मतांचे विभाजन करण्यासाठी येथे एमआयएम, सपा आणि काँग्रेसही मैदानात उतरले होते. त्यानुसार, काँग्रेसमध्ये असतानासुद्धा शिवसेनेची मुलाखत देणाऱ्या राजन किणे यांचादेखील श्विसेनेने पत्ता कट केला होता. मुंब्य्रातील मतांचे विभाजन झाल्याने कळव्यातील मतांवर शिवसेनेचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा कयासही लावला गेलाा होता. त्यामुळे कळव्यातील मतांवरच आव्हाड आणि पाटलांचे भवितव्य ठरणार होते. तसेच चारपैकी या मतदारसंघावर सर्व राजकीय पक्षांच्या नजरा खिळून होत्या. काही तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणीला काहीसा विलंब झाला. त्यानंतर, उशिराने मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे दशरथ पाटील यांनी काहीशी आघाडी घेतल्याचे चित्र होते. परंतु, त्यांना ही आघाडी फारशी टिकवता आली नाही. पुढील काही फेऱ्यांनंतर ही आघाडी तुटत गेली आणि नंतर आव्हाडांनी आघाडी कायम करण्यास सुरुवात केली. त्यानुसार, निकाल हाती आला तेव्हा सर्वपक्षीयांचे चक्रव्यूह भेदण्यात आव्हाड यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले.
चक्रव्यूह आव्हाडांनी भेदले
By admin | Updated: October 20, 2014 03:52 IST