Join us

मातोश्रीत स्वयंपाक्याचा सहकाऱ्यावर चाकूहल्ला

By admin | Updated: November 17, 2015 02:20 IST

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्री बंगल्यात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद होऊन एकाने दुसऱ्यावर चाकूहल्ला केला.

मुंबई : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्री बंगल्यात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद होऊन एकाने दुसऱ्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी हल्लेखोर स्वयंपाक्याला पोलिसांनी अटक केली आहे. अतिरेक्यांच्या रडारवर असलेल्या मातोश्री बंगल्याच्या सुरक्षेवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंगल्यात सेवक आणि पंडित हे दोघे घरकाम करतात. मूळचे नेपाळचे असलेले हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री बंगल्यात काम करीत आहेत. एकमेकांची टर उडविणे आणि चिडवण्यावरून या दोघांमध्ये भांडण झाले. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्या वेळी सेवकने स्वयंपाकघरातील चाकू उचलून पंडितवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची सहकारी मंदादेखील जखमी झाली. या प्रकरणी सेवकला अटक करण्यात आली आहे. सेवकला पोलीस कोठडी सुनावल्याचे परिमंडळ ८चे पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी सांगितले. या बंगल्याची सुरक्षा ही मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन ब्रांचची जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रकार सुरक्षेतील उणिवांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)