Join us
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी ठरणार नाट्य निर्माता संघाचा अध्यक्ष...!

By admin | Updated: October 14, 2016 06:42 IST

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत १५ जणांची कार्यकारिणीचे सदस्य म्हणून वर्णी लागली आहे

राज चिंचणकर / मुंबईमराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत १५ जणांची कार्यकारिणीचे सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. यातून निर्माता संघाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र येत्या रविवारी, १६ आॅक्टोबर रोजी अध्यक्षांची निवड होण्याची चिन्हे आहेत.या निवडणुकीत एकूण २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातून ७ जणांनी नावे मागे घेतल्याने १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यात प्रसाद कांबळी, विजय केंकरे, संतोष कोचरेकर, श्रीकांत तटकरे, मुक्ता बर्वे, राहुल भंडारे, भरत जाधव, दिनू पेडणेकर, शेखर दाते, गोविंद चव्हाण, सुनील बर्वे, श्रीपाद पद्माकर, राकेश सारंग, सुशील आंबेकर आणि संतोष काणेकर यांचा समावेश आहे. या १५ जणांतून निर्माता संघाचा अध्यक्ष निवडला जाणार असून, येत्या रविवारी कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षांच्या नावावर शिक्कमोर्तब होणार असल्याची माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली. दरम्यान, अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून प्रसाद कांबळी यांच्यासह संतोष काणेकर, गोविंद चव्हाण यांच्या नावाची नाट्यसृष्टीत जोरदार चर्चा आहे. नाट्य निर्माता संघाचे अध्यक्षपद कुणाच्या गळ्यात पडणार, यासाठी येत्या रविवारची वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)