२२ हजार कोटींचा एसआरए घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हजारो कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केलेल्या ओंकार बिल्डर्स ग्रुपचे अध्यक्ष कमल गुप्ता व व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना शनिवारपर्यंत (दि.३०) ईडी कोठडी मिळाली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अन्य काही जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) २२ हजार कोटींचा गैरव्यवहार व येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणी या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. ओंकार समूहाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी विविध बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यामध्ये येस बँकेकडून ४५० कोटी घेतले. ईडीने सोमवारी ओंकार ग्रुपच्या नेपियन्सी रोड येथील मुख्य कार्यालय व निवासस्थानासह विविध १० ठिकाणी छापे टाकले होते. गेले दोन दिवस त्या ठिकाणाहून आर्थिक व्यवहारासंबधी दस्तावेज व कागदपत्रे जप्त केली. बाबूलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांना २७ जानेवारीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. सुमारे ५ तास कसून चौकशी केल्यानंतर दोघांना अटक केली.
...............