Join us

साखळीचोरांची आता गय नाही!

By admin | Updated: October 6, 2015 00:33 IST

साखळीचोरांना पकडण्यासाठी ठाणे पोलीसांनी गस्त वाढविण्याबरोबरच इराणी वस्त्यांवरही कोबींग आॅपरेशन राबविणे सुरु केले आहे. त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे

ठाणे : साखळीचोरांना पकडण्यासाठी ठाणे पोलीसांनी गस्त वाढविण्याबरोबरच इराणी वस्त्यांवरही कोबींग आॅपरेशन राबविणे सुरु केले आहे. त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे. शिवाय, कुठेही असा साखळीचोर आढळून आल्यास तातडीने पोलीसांशी संपर्क साधा, त्यांची कोणत्याची प्रकारे गय केली जाणार नाही, असा इशारा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांनी दिला आहे.‘लोकमत’च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमांतर्गत शनिवारी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘सोनसाखळी चोरी’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. दागिने वापरणे ही भारतीय महिलांची संस्कृती आहे. बऱ्याचदा, इराणी टोळयांकडून टेहळणी करुन पहाटे आणि रात्री कोणत्याही वेळी एखाद्या महिलेचे मंगळसूत्र किंवा सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडतात. यात महिला पडतात, जखमीही होतात. या घटनांनंतर या टोळया वेषांतर करुन मोटारसायकलवरुन पसार होतात. ठाण्यात वर्षभरात ९०० सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून त्यातील ५०० चोऱ्या उघड झाल्या आहेत. ६७ जणांवर मोक्क कारवाई झाली आहे. - स्टार वाहिनीवरील ‘लक्ष्य’ मालिकेतील कलाकारांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. उपनिरीक्षक वीरेंद्र कदम अर्थात जगन्नाथ निवंगुणे, प्रेरणा सरदेसाई अर्थात धनश्री क्षीरसागर आणि हवालदार मारुती जगदाळे तथा कमलेश सावंत यांनीही प्रत्यक्ष जीवनात आलेले अनुभव कथन करुन ठाणेकरांशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. नंदा शेटे या महिलेने सोनसाखळी हिसकावणाऱ्यास मोठया धाडसाने रंगेहाथ पकडून दिले होते. त्यांचा ठाणेकरांच्या वतीने धनश्री क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.