Join us
Daily Top 2Weekly Top 5

 बीसीए, बीएमएस, बीबीएच्या प्रवेशासाठी सीईटी

By रेश्मा शिवडेकर | Updated: March 20, 2024 17:43 IST

राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार सीईटी सेलने ‘महा.बी.बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटी, २०२४’ ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व बाहेरील परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - बीसीए, बीएमएस, बीबीए, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश ‘सामाईक प्रवेश परीक्षे’मार्फत (सीईटी) केले जाणार आहेत. ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’ने या संदर्भात सूचना प्रसिद्ध केली आहे.

या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या आधारे होणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने १० जानेवारीच्या अंकात ‘बीसीए, बीएमएम, बीबीएसाठी पुढच्या वर्षापासून सीईटी?’ या मथळ्याखाली दिले होते. त्यानुसार ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) केलेल्या सूचनेनुसार ‘उच्च आणि तंत्रशिक्षण विभागा’कडून राज्याच्या सीईटी सेलकडे सीईटी घेण्याबाबत विचारणा केली होती.

राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार सीईटी सेलने ‘महा.बी.बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटी, २०२४’ ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व बाहेरील परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सीईटीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी २१ मार्च ते ११ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. सीईटीचा अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईपरीक्षा