Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षा ठरणार विद्यार्थ्यांसाठी अग्निदिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST

अकरावी प्रवेशासाठी इच्छुक असणारे सर्वच मंडळाचे विद्यार्थी ही सीईटी देण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे सीईटीचा अभ्यासक्रम कोणत्या मंडळाचा असावा ...

अकरावी प्रवेशासाठी इच्छुक असणारे सर्वच मंडळाचे विद्यार्थी ही सीईटी देण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे सीईटीचा अभ्यासक्रम कोणत्या मंडळाचा असावा यावर राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी आणि इतर मंडळाचे विद्यार्थी यांमध्ये मतमतांतरे आहेत. आकडेवारीनुसार यंदा राज्य शिक्षण मंडळाचे दहावीचे तब्बल १६ लाख विद्यार्थी आहेत, तर आयसीएसई, सीबीएसई आणि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा विचार केल्यास ही संख्या १ लाखाहून अधिक आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या पटीने निश्चितच १५ ते १६ पटीने अधिक आहे. शिवाय अकरावीनंतर इतर कोणत्याही मंडळाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी राज्य शिक्षण मंडळाचाच अभ्यास करणे अनिवार्य असल्याचे मत मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी व्यक्त केले.

दुसरीकडे, अनेक सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे विद्यार्थी हे त्यांच्या दहावीच्या परीक्षेत समाजशास्त्र सारखे विषय पर्यायी म्हणून ठेवतात. अशावेळी अशा विषयांवर आधारित सीईटी विद्यार्थ्यांना देणे कठीण जाऊ शकते, असे मत स्कूल लीडर फाउंडेशन संस्थेचे संस्थापक आणि शिक्षणतज्ज्ञ असलेल्या फ्रान्सिस जोसेफ यांनी व्यक्त केले. अकरावी प्रवेशाची सीईटी ऐच्छिक असल्याने सीबीएसई आणि इतर मंडळाचे किती विद्यार्थी ती देणार आणि अकरावी प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे इतर मंडळे आणि राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये चुरस किती रंगणार यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

कोट

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशसंख्या आणि इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या पाहता मोठी तफावत आहे. सीईटीसाठी निवडलेले विषय आणि निकष हे सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरतील, हा विचार करूनच निश्चित केलेले आहेत. तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधीही असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू करावी.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ