Join us

तिशीत काढावी लागतेय गर्भाशयाची पिशवी

By admin | Updated: June 22, 2017 04:42 IST

लातूरमध्ये बचत गटांमध्ये काम करणाऱ्या सुमारे २० टक्के महिलांच्या गर्भाशयातील पिशवी वयाच्या तिशीतच काढावी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लातूरमध्ये बचत गटांमध्ये काम करणाऱ्या सुमारे २० टक्के महिलांच्या गर्भाशयातील पिशवी वयाच्या तिशीतच काढावी लागल्याचे धक्कादायक वास्तव लातूरच्या विचारधारा ग्रामीण विकास संस्थेने समोर आणले आहे. तरी जीएसटीच्या कक्षेत आणलेल्या सॅनिटरी नॅपकिनला करातून वगळण्याची मागणी करत संस्थेच्या महिलांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ३० जूनपर्यंत राज्य सरकारने मागणी मान्य केली नाही, तर जुलै महिन्यात दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा संस्थेच्या सचिव छाया काकडे यांनी दिला आहे.काकडे यांनी सांगितले की, विचारधारा ग्रामीण विकास संस्थेशी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे ३० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यातील सुमारे २० टक्के महिला मासिक पाळीदरम्यान खराब कापड वापरत असल्याने आणि उघड्यावर शौचास जात असल्याने त्यांच्या गर्भाशयाची पिशवी अवघ्या तिशीतच काढावी लागली. ही बाब पंतप्रधानांच्या लक्षात यावी, म्हणून महिलांनी तयार केलेले सॅनिटरी नॅपकिन पंतप्रधानांना पाठवले आहेत. याशिवाय पंतप्रधानांनी या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी त्यांना टिष्ट्वटही केले आहे.राज्य सरकारने या प्रकरणी पुढाकार घ्यावा, म्हणून गाऱ्हाणे घालण्यासाठी दरवर्षीची वारी सोडून संस्थेतील भजनी मंडळातील महिलाही या आंदोलनात सामील झाल्या आहेत. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात ठोस भूमिका घेण्यासाठी संस्थेने निवेदन दिले आहे.