Join us  

Mumbai Train Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मरमर, तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 7:39 AM

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रडरड सहन करावी लागत आहे. कारण तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 6 लोकल गाड्यांचा खोळंबामध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिरानं

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रडरड सहन करावी लागत आहे. कारण तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीकडे जाणारी जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गांवरील वाहतूक तब्बल 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. कांजूरमार्ग स्टेशनवर सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या 6 लोकल गाड्यांवर या बिघाडाचा परिणाम झाला आहे. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. या बिघाडामुळे ऑफिस गाठण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, रविवारचा (18 नोव्हेंबर) दिवसदेखील मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी तापदायकच ठरला. पत्री पुलाच्या पाडकामामुळे मुंबईकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पाडकामामुळे लोकलसह मेल-एक्सप्रेस ठप्प असल्याने स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. मध्य रेल्वेकडून नियोजित वेळेआधी लोकल सेवा सुरू केल्याचा दावा होत असला तरी प्रत्यक्षात सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकलची प्रतीक्षा कायम होती. डोंबिवलीहून येणा-या लोकल गर्दीने भरून येत असल्याने मुलुंड, नाहूर, घाटकोपरसह कुर्ला, सायन आणि दादर स्थानकातील प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागली.

सहा तासांच्या मेगाब्लॉकदरम्यान कल्याण-डोंबिवलीदरम्यानची लोकलसेवा बंद करून अन्य १४० लोकलफेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या. काही लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले होते. सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता, तर कल्याणहून सकाळी ९ वाजून ९ मिनिटांची लोकल मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. मेगाब्लॉकला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ होणार होता; परंतु सकाळी ९ वाजतापासूनच डोंबिवलीला आलेल्या लोकल कल्याणच्या दिशेने रवाना केल्या जात नव्हत्या. त्या डोंबिवली स्थानकातच रद्द केल्या जात होत्या. यामुळे कल्याणकडे जाणा-या प्रवाशांचे मेगाब्लॉकच्या आधीच हाल झाले. यासंदर्भात कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने प्रवासी गोंधळले होते.

टॅग्स :मध्य रेल्वेलोकलमुंबई ट्रेन अपडेट