Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीचा बोऱ्या

By admin | Updated: November 12, 2016 06:03 IST

काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रवाशांनी मेल-एक्सप्रेसची वरच्या श्रेणीतील वेटिंग लिस्टची तिकीटे खरेदी करण्याचा चंग बांधला.

मुंबई : काळा पैसा पांढरा करण्यासाठी प्रवाशांनी मेल-एक्सप्रेसची वरच्या श्रेणीतील वेटिंग लिस्टची तिकीटे खरेदी करण्याचा चंग बांधला. यामुळे रेल्वेला जरी चांगले उत्पन्न मिळाले असले तरी दुसरीकडे तिकीट तपासणीचा पूर्णत: बोऱ्या वाजल्याचे समोर आले आहे. तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेला मिळणारे उत्पन्न हे कमी झाले असून जवळपास ४0 टक्के ‘कलेक्शन’झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हीच स्थिती पश्चिम रेल्वेवरही उद्भवली आहे. ५00 आणि १000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या नोटांचा वापर रेल्वेसह, रुग्णालय, वीज बिल भरणा केंद्रसह काही मोजक्याच ठिकाणी केला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांनी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील आरक्षण केंद्राकडे धाव घेतली आणि वेटिंग लिस्टवरील फर्स्ट आणि सेकंड तसेच थर्ड एसीची तिकीटे काढली. हे तिकीट रद्द केल्यानंतर त्वरीत परतावा मिळत असल्याने त्यावर चाप लावत रेल्वेने परतावा प्रवाशांच्या बँकेतील खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांकडून अशाप्रकारे काही पर्याय ५00 आणि १000 च्या नोटा वापरात काढण्यासाठी शोधले जात असतानाच दुसरीकडे दंडात्मक कारवाईवेळीही याच नोटा पुढे केल्या जात असल्याचेही समोर आले आहे. रेल्वे स्थानकात विना तिकीट, सेकंड क्लास तिकीटावर फर्स्ट क्लास प्रवास केल्यावर टीसींकडून दंडात्मक कारवाई केली जाते. ही कारवाई २५0 रुपये एवढी आहे. तर संबंधित प्रवाशाने कुठल्या स्थानकांपर्यंत प्रवास केला आहे ते पाहून २५0 रुपये आणि त्या स्थानकापर्यंतच्या तिकीटांची किंमत असा एकूण दंड वसुल केला जातो. मात्र हा दंड वसुल करताना ९ नोव्हेंबरपासून अनेक जण ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा टीसींना देत आहेत. त्यामुळे या नोटा स्विकारायचा कशा असा प्रश्न टीसींना पडला. या नोटा न स्विकारताच काही प्रवाशावर दंडाची किरकोळ कारवाई केली जात आहे. तर काहीं प्रवाशांना समज देऊन सोडण्यात येत आहे. अशामुळे मध्य रेल्वेचे दोन दिवसांत ४0 टक्के कलेक्शन कमी झाले आहे.