Join us

मध्य रेल्वेवर ३५ लोकलची गरज

By admin | Updated: February 21, 2015 03:10 IST

शहर आणि उपनगरांपर्यंत लोकलचा पसरलेला पसारा आणि त्यामधून प्रवास करणारे लाखो प्रवासी पाहता सध्या धावत असलेल्या लोकल मध्य रेल्वेला कमी पडत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : शहर आणि उपनगरांपर्यंत लोकलचा पसरलेला पसारा आणि त्यामधून प्रवास करणारे लाखो प्रवासी पाहता सध्या धावत असलेल्या लोकल मध्य रेल्वेला कमी पडत असल्याचे समोर आले आहे. उपनगरीय मार्गावर दरवर्षी ३0 हजार प्रवाशांची वाढ होत असून, हे पाहता सध्या ३५ लोकलची गरज असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेमार्गावर ४२ ते ४३ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. यात प्रामुख्याने उपनगरातील वाशी ते पनवेल, ठाणे ते वाशी, कसारा ते ठाणे, कसारा ते कर्जत या विभागांत प्रचंड वाढ होत आहे. वाशी ते पनवेल विभागात रहिवासी, व्यापारी संकुले मोठ्या प्रमाणात वाढत असून, गेल्या काही वर्षांत तर या भागाचा विकास चांगल्या रीतीने झाला आहे आणि त्या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे ते वाशी विभागातही गेल्या चार वर्षांत प्रवासी वाढल्याचे लक्षात आले आहे. तीच परिस्थिती कसारा-ठाणे आणि कसारा ते कर्जत विभागांची असून, या भागाला लोकल सेवा पुरविण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. प्रत्येक वर्षी साधारणपणे ३0 हजार प्रवासी या विभागात वाढत असून, त्यामुळे ज्यादा लोकलची गरज भासत आहे. रेल्वेकडून करण्यात आलेल्या अभ्यासात ३५ लोकलची गरज असल्याचे या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ही गरज पूर्ण झाल्यास या विभागातील प्रवाशांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल, अशी आशा रेल्वेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)मध्य रेल्वेकडे १२१ लोकल असून, यात मेन लाइनवर ७५, हार्बरवर ३६ आणि ट्रान्स हार्बरवर १0 लोकल आहेत. या मार्गावर सध्यातरी १२ डब्यांच्या लोकल धावतात. मात्र मध्य रेल्वेकडे ज्यादा लोकल नसून, येणाऱ्या नवीन लोकल गाड्यांवरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येते.