डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप धिम्यासह हार्बरच्या मशीद-चुनाभट्टी आणि वडाळा रोड-माहीम मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स. ११.१५ ते दु. ३.१५ आणि स. ११.३० ते दु. ३.३० या वेळेत घेण्यात येणार आहेत. कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर ब्लॉक असल्याने ब्लॉकच्या कालावधीत त्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे अप धीम्या मार्गावर ठाकुर्ली-कळवा स्थानकांत लोकल उपलब्ध नसतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे म.रे.ने जाहीर केले. या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना आहे त्याच तिकिटावर ठाणे-डोंबिवली स्थानकांतून प्रवासाची मुभा दिली आहे. हार्बरच्या मशीद-चुनाभट्टी आणि वडाळा रोड-माहीम मार्गांवर ब्लॉक असल्याने वाशी/बेलापूर/पनवेल येथून सीएसटीसाठी आणि तेथून त्या स्थानकांसाठी धावणाऱ्या लोकल ब्लॉकच्या कालावधीत रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी/वांद्रे येथून सीएसटीसाठी आणि तेथून त्या स्थानकांसाठी धावणाऱ्या लोकल त्या वेळेत रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला-पनवेल मार्गावर फलाट क्र. ८ वरून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. हार्बरच्या प्रवाशांना स. १० ते संध्या. ६ या वेळेत आहे त्या तिकीट/ पासावरच म.रे.च्या मुख्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासाची मुभा असेल, असेही जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक
By admin | Updated: October 4, 2015 04:35 IST