Join us

दिवा स्थानकात मध्य रेल्वेचा वेग मंदावला

By admin | Updated: August 3, 2015 01:08 IST

मध्य रेल्वेने रविवारी ठाणे-कल्याण डाऊन जलदवर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवली होती.

डोंबिवली : मध्य रेल्वेने रविवारी ठाणे-कल्याण डाऊन जलदवर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवली होती. त्यामुळे जलदच्या डाऊनचा वेग मंदावला होता. दिवा स्थानकादरम्यान ट्रॅकलगतचे काम करण्यात आले होते. रुळांच्या ट्रॅकमध्ये टाकण्यात येणारी खडी वाहून नेणारी गाडी सकाळपासूनच उभी होती. अभियंत्यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रॅकचे काम करण्यात आले. ट्रॅकची तपासणी, त्यातील खडी बदलणे, फलाटांमध्ये असलेली खडी त्या गाडीत टाकण्यात आली. यासह सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती-पाहणी करण्यात आली. जलदच्या मार्गावर वाहतूक मंदावल्याने त्याचा त्रास लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही झाला. त्यामुळे त्या गाड्यांमधील प्रवाशांना काही वेळ ताटकळावे लागले. डाऊनच्या जलदवर ब्लॉक असल्याने ठाणे-कल्याणच्या धीम्या स्थानकांमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. दुपारी १२नंतर मात्र गर्दी कमी झाल्याने प्रशासनावरचा ताण कमी झाला. त्यामुळे स्थानकातील विविध ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनीही स्वच्छतेसह अन्य कामे केल्याचे दिसून आले. दिवा, मुंब्रा आणि डोंबिवलीत स्वच्छतागृहांमधील असुविधा तसेच फलाटातील गळके पत्रे कोठे आहेत, त्याची पाहणी, दुरुस्ती केली. कचरा व्यवस्थापन करताना सफाई कामगारांनी स्थानकातून ज्या ठिकाणाहून पावसाच्या पाण्याचा निचरा होतो, त्या ठिकाणी प्रामुख्याने स्वच्छता केली. तसेच जेथे उपाहारगृहे आहेत, त्या ठिकाणच्या स्वच्छतेवरही भर देण्यात आला.