Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेला मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट

By admin | Updated: September 1, 2015 02:13 IST

सणासुदीच्या काळात लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जास्त असते आणि त्याचाच फायदा उपनगरीय रेल्वेला मिळतो. रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी प्रवास

मुंबई : सणासुदीच्या काळात लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जास्त असते आणि त्याचाच फायदा उपनगरीय रेल्वेला मिळतो. रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी प्रवास करतानाच एटीव्हीएमचा वापर जास्त केल्याने यातून तब्बल ८२ लाखांची कमाई मध्य रेल्वेला झाली आणि एक चांगले गिफ्ट रेल्वेला दिले. एटीव्हीएमचा जास्त वापर झाल्याने सणासुदीच्या दिवसात ही सेवा अधिक सोयिस्करपणे कशी देता येईल यावर विचार केला जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारी तसेच काही खाजगी कार्यालयांना सुट्टी नव्हती. त्यामुळे अनेकांनी वेळ मिळेल तसा किंवा सुट्टी घेवून हा सण साजरा केला. या दिवशी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही सर्वात जास्त होती. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दीचे चित्र होते. स्थानकांवर असणारी गर्दी पाहता अनेकांनी तर खिडक्यांवर तिकिट काढण्याऐवजी एटीव्हीएमवर तिकिट काढण्याचा पर्याय निवडला आणि त्याचाच फायदा प्रवाशांना तसेच रेल्वेलाही झाला. दररोज दहा लाख तिकिटांची विक्री होणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी जवळपास १४ लाखांपर्यंत तिकिट विक्री झाली. यामध्ये ३ लाख ९0 हजार प्रवाशांनी एटीव्हीएममधून तिकिटे काढली. त्यामुळे मध्य रेल्वेला तब्बल ८२ लाख ९ हजार २२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतर दिवशी एटीव्हीएममधून तिकिट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या हीच २ लाख ५0 हजार एवढी असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे तिकिट खिडक्यांमधून ७ लाख ८0 हजार प्रवाशांनी तिकिटे काढली. तर प्रत्येक दिवशी हेच प्रमाण साडे सहा ते सात लाखांच्या दरम्यान असते. जेटीबीएसमधूनही (जनसाधारण तिकिट सेवा) २ लाख ७0 हजार प्रवाशांनी तिकिट काढल्याचे सांगण्यात आले.