Join us  

मध्य रेल्वे प्रशासनाकडून २८५ मुलांची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 5:55 AM

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने २८५ मुलांची घरवापसी केली आहे.

मुंबई : जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाने २८५ मुलांची घरवापसी केली आहे. रेल्वे परिसरात हरविलेल्या किंवा पळून आलेल्या २८५ मुलांना विश्वासात घेऊन त्यांना मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे. रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या वतीने अशा मुलांना शोधले जाते. त्यांची समजूत काढली जाते. त्यानंतर त्यांची घरवापसी केली जाते, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.मुंबईतील विविध स्थळांचे आकर्षण, ग्लॅमरस दुनिया, सेलीब्रिटींना भेटण्याच्या इच्छेखातर, पालकांना कंटाळून, मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी लहान मुले मुंबईमध्ये येतात. मुंबईतील गर्दीमध्ये अशी लहान मुले हरवतात. त्यांना विश्वासात घेऊन, त्यांची विचारपूस करून त्यांची घरवापसी किंवा सामाजिक संस्थांमध्ये रवानगी रेल्वे सुरक्षा बलाने केली आहे. २०१८ साली मुंबईत हरविलेल्या ४७७ मुलांची घरवापसी मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागाने केल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.बुधवारी सुरक्षा विभागाने ११ वर्षांच्या मुलाची घरवापसी केली. विठ्ठलवाडी स्थानकात मुख्य तिकीट तपासणीस मुकेश गौतम यांनी मुलाची विचारपूस केली. त्यावर मुलाने आजीचा मोबाइल क्रमांक सांगितला. त्यावर संपर्क साधून ११ वर्षीय मुलाच्या पालकांना बोलाविण्यातआले.हा ११ वर्षीय मुलाने पालकांना कंटाळून घर सोडले होते. त्याला पुन्हा घरी जायचे नव्हते. काहीही झाले तरी घरी परत जाणार नाही, या विचारावर मुलगा ठाम होता. मात्र या मुलाला समजावून त्याला पालकांकडे सोपविण्यात आले, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.