Join us  

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला गारांसह अवकाळी पाऊस  इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 7:36 PM

मराठवाडा आणि विदर्भात गारांचा पाऊस पडून पंधरवडा उलटत नाही तोवर आता पुन्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भात गारांचा पाऊस पडून पंधरवडा उलटत नाही तोवर आता पुन्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. २३ फेब्रूवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल. २४ फेब्रूवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.गारांच्या पावसाचा इशारा देतानाच २२ फेब्रूवारीपर्यंत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २३ फेब्रूवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. २४ फेब्रूवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे मुंबईचे आकाश निरभ्र राहील. बुधवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २१ अंशाच्या आसपास राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई