Join us

केंद्र सरकार जनतेच्या जिवाशी खेळते आहे - अरविंद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:07 IST

ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार क्रूर राजकारण करत असल्याचा ...

ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार क्रूर राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी केला आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला कळंबोलीहून निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने फिरवत ठेवले आहे. जनतेच्या जिवाशी खेळण्याचा, विश्वासघात करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

ऑक्सिजन एक्स्प्रेसबाबत माध्यमांना अरविंद सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार १९ तारखेला कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस अजूनही फिरतेच आहे. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. गाडीला जायचे आहे विशाखापट्टणमला पण ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागणार आहेत. महाराष्ट्राच्या पाठीत सुरा खुपसण्याचा हा प्रकार आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही सावंत यांनी केली.

कोरोनाच्या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षाकडून राजकारण सुरू आहे. गरिबांच्या जीवाशी खेळणारे राजकारण केले जात आहे. राज्याने केलेले चांगले काम दिसू नये, यासाठी घाणेरडे राजकारण सुरू आहे. असाच प्रकार भिलाई प्लांटमधून महाराष्ट्राला शंभर टक्के ऑक्सिजन पुरवण्याचे ठरले होते; मात्र आता ते केवळ साठ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. हा बदल कोणी आणि का केला, याचेही उत्तर मिळायला हवे. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी अडवणुकीचे राजकारण केले जात आहे. विरोधक सत्तेसाठी कासावीस झाले आहेत, असेही सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत आहेत; पण त्यांनी चार तासाच्या अवधीत लाॅकडाऊन जाहीर केला होता. त्याचा फायदा जरूर झाला. आता तर डबल म्युटेशनचा विषाणू आहे. तो अधिक धोकादायक आहे. अजून बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की पंतप्रधानच लॉकडाऊनची घोषणा करतील, असे भाकीतही सावंत यांनी केले.

* राज्य सरकारने खेळखंडोबा मांडला आहे - केशव उपाध्ये

महाराष्ट्रातील कोरोनाचा संकटात सर्व सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकारनेच या प्रश्नाचा खेळखंडोबा केला आहे. राज्य सरकारला ऑक्सिजन टँकरसाठी चालक देता आले नाहीत. रेमडेसिविर, ऑक्सिजन अशा सर्व आघाड्यांवर राज्यातील सरकारने गोंधळ घालून ठेवला आहे. यातूनही केंद्र सरकार वाट काढण्याचा प्रयत्नात असताना आरोपबाजी केली जात असल्याचा पलटवार भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. मुळात सावंत यांना या विषयाची पुरेशी माहिती असल्याचे दिसत नाही. ज्या पद्धतीने राज्य सरकारने खेळखंडोबा मांडला आहे तसाच गोंधळ सावंत यांचा उडाल्याचा दिसतो, असेही उपाध्ये म्हणाले.