मुंबई : कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच वाढवलेल्या पाळीव प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याचे रीतसर अंत्यसंस्कारही करता यावे, अशी मालकाची इच्छा असते़ त्यामुळे महापालिकेने पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेच्या महासभेत करण्यात आली आहे़मुंबईत २७ हजार पाळीव प्राणी आहेत़ श्वानच नव्हे तर मांजरी, पक्षीही मोठ्या प्रमाणात पाळले जातात़ पाळीव प्राण्यांचा परवाना शुल्क पालिका संबंधित मालकाकडून वसूल करीत असते़ मात्र शुल्क भरूनही या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची कोणतीच सुविधा मुंबईत नाही़ त्यामुळे मृत प्राण्यांना मोकळ्या जागेत पुरणे अथवा डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकले जाते़ मात्र यामुळे आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते़ त्यामुळे पालिकेने पूर्व व पश्चिम उपनगरात पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ़ सईदा शेख यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेच्या महासभेपुढे केली आहे़ ही मागणी मान्य झाल्यानंतर आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी
By admin | Updated: January 16, 2015 03:30 IST