Join us

सिमेंटचे ब्लॉक कोसळून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: July 29, 2015 02:21 IST

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून लगतच्या चाळीवर सिमेंटचे ब्लॉक कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.

नवी मुंबई : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून लगतच्या चाळीवर सिमेंटचे ब्लॉक कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. करावे गाव येथे मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तेथील रहिवासी सीताबाई दळवी यांच्या घराच्या जागेवर नव्या इमारतीचे बांधकाम खाजगी ठेकेदारामार्फत सुरू होते. इमारतीचे चार मजले पूर्ण झाल्याने त्याखालील मजल्यांवर भिंत बांधण्याचे काम सुरू होते. त्याकरिता भिंत बांधण्याच्या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक (सिमेंट विटा) ठेवलेले होते. मात्र त्याला कसलाही भक्कम आधार दिलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारी सकाळी सिमेंटच्या ब्लॉकची ही भिंत चाळीतील एका घरावर कोसळली. हे जड ब्लॉक छताचे पत्रे फोडून घरातील व्यक्तींवर कोसळले. त्यामध्ये महेंद्र खंदारे (३०) यांचा जागीच मृत्यू झाला; तर त्यांची पत्नी रंजना (२६), मुलगा संघरत्न (७) व मुलगी समृद्धी उर्फ परी (२) हे तिघे गंभीर जखमी झाले होते. समृद्धीला उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.