Join us  

कोरोनाच्या सावटाखाली नवरात्रोउत्सव होणार साजरा मंडप परवानगीचे अर्ज आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:45 PM

कोरोनाचे वाढते संकट डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोउत्सवही साधे पणाने साजरा करण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यानुसार मंडप उभारणीची परवानगी घेण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी महापालिकेच्या वेबसाईटवर आॅनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पालिकेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालनही मंडळांना करावे लागणार आहे.

ठाणे : ठाण्यात ज्या पध्दतीने गणेशोत्सव साध्या पध्दतीने आणि विविध आरोग्य उपक्रम हाती घेऊन राबविण्यात आला. त्यानुसारच आता नवरात्रोत्सव देखील राबविण्यात यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आजही ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात येणारे मंडप परवानगी अर्ज आता पालिकेने आॅनलाईन पध्दतीने मागविले आहेत. तर यंदा ठाण्यात बहुसंख्य ठिकाणी नवरात्रोत्सवात गरबा काही होणार नसल्याचे अनेक मंडळांनी स्पष्ट केले आहे. तसेच या कालावधीतही पालिकेची मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी मंडळांना करावी लागणार आहे.                     आजही शहरात कोरोनाचे रोज ३०० ते ४५० रुग्ण आढळून येत आहेत. इतर शहरांच्या तुलनेत महापालिकेने कोरोनावर मात करण्यात यश मिळविले असले तरी सणांच्या काळात ही संख्या आणखी वाढू नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या काळात ज्या पध्दतीने ठाणे महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सुचना काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार नवरात्रोत्सवातही तशाच स्वरुपाच्या मार्गदर्शक सुचना असतील असे पालिकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आता नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यास पालिकेने सुरवात केली. आॅनलाईन अर्ज स्विकारले जाणार असून मंडप परवानगी शुल्काची रक्कम देखील आॅनलाईन पध्दतीनेच भरावी लागणार आहे. ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून १७ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत अर्ज स्विकारले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी मंडप उभारतांना पालिकेच्या मार्गदर्शक सुचनानुसारच प्रभाग समिती कार्यालयाकडून आवश्यक ती परवानगी घेऊन परवानगी पत्रात नमूद मोजमापा नुसारच मंडप उभारणी करावी लागणार आहे. तर विनापरवानगी मंडप उभारणी केल्यास कायदेशीर कारवाईला देखील मंडळांना सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही मार्गदर्शक सुचना यापूर्वी करण्यात आलेल्या त्यांचे पालन करणेही मंडळांनी बंधनकारक असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.दरम्यान गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही यंदा साधे पणाने साजरा करावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात ज्या काही मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या होत्या, तशा प्रकारच्या सुचना नवरात्रोत्सवातही कायम असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. एकूणच गणेशोत्सवाप्रमाणे यंदा नवरात्रोत्सव देखील साधे पणाने आणि गर्दी टाळण्यासाठी गरबा न खेळण्याचाच विचार अनेक मंडळांनी केला आहे. तसेच मुर्तींची उंचीही कमी ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाआयुक्त