ठाणे : पारंपरिक कोळीगीतांवर ठेका धरून दर्यासागराला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमेचा सण कळवा खाडी परिसरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. ठाणे शहराचा मानाचा सोन्याचा नारळ महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दर्याराजाला अर्पण केला. तर दुसरीकडे रक्षाबंधनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत होता. अनेक भाऊ-बहिणींनी एकमेकांना व्हॉटस्अॅप, एसएमएस, इंटरनेटवरून शुभेच्छाच नव्हे तर राखी, मिठाईचे इमेजेस पाठवून रक्षाबंधन साजरे केले. काही ठिकाणी रक्षाबंधनाचे अभिनव उपक्रम आयोजिण्यात आले होते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित नारळीपौर्णिमा उत्सवात कोळी बांधव पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. दुपारपासूनच कोर्ट नाक्याहून कळवा खाडी ब्रिजवर जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलले होते. या ठिकाणी भरलेल्या जत्रेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन महिने विश्रांती घेतलेल्या नौका रंगरंगोटी करून पुन्हा समुद्रात उतरविण्यात आल्या होत्या. यावेळी समुद्राची विधीवत पूजा करण्यात आली. सणाच्या आनंदाबरोबरच यंदा भरपूर मासे मिळून चांगला व्यापार होऊ दे आणि कोळी बांधवांना सुखशांती मिळू दे, असे साकडे कोळी बांधवांनी दर्यासागराला घातले. तर घरोघरी बहिणींनी भावांना राखी बांधून औक्षण केले. सर्वच वयोगटात हा सण साजरा झाला असला तरी चिमुरड्यांचा उत्साह विशेष पाहण्यासारखा होता. शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एन.के.टी सभागृहात जातीय सलोख्यांतर्गत हिंदू-मुस्लीम रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी हिंदू महिलांनी मुस्लीम बांधवांना तर मुस्लीम महिलांनी हिंदू बांधवांना राख्या बांधल्या. (प्रतिनिधी)
नारळीपौर्णिमेचा सण जिल्ह्यात जल्लोषात
By admin | Updated: August 11, 2014 00:07 IST