मुंबई : प्रत्येक जण हा स्वत:चा मार्गदाता असतो. सदाचाराचे आयुष्य जगायचे की दुराचाराचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते, हा मूलमंत्र देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मुंबईत उत्साहात साजरी करण्यात आली.नायगाव, परळ, वरळीसह मुंबईतील ठिकठिकाणच्या बुद्धविहारांमध्ये पंचशील ग्रहण करून या महामानवाचे स्मरण करण्यात आले. काही ठिकाणी मेणबती रॅलींचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते. यात लहान-थोर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.परळ येथील आनंद बुद्धविहारासह बहुतांश बुद्धविहारात भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. नेपाळ भूकंपग्रस्तांसाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. परळ बुद्धविहारातील कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्ते नागसेन कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांनी मानवता शिकवली. शांततेचा मार्ग दाखवला. आणि या मार्गाची सध्या संपूर्ण जगाला गरज आहे.बुद्धपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी खीरचे वाटप करण्यात आले. नायगाव येथे काही मंडळांनी पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कुशल स्नेह मंडळाच्या वतीने बुद्धवंदना घेण्यात आली. यात मंडळाचे सदस्य शशिकांत बर्वे, विलास जाधव, शैलेश तांबे, शैलेश पवार व इतर सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भगवान बुद्ध यांची जयंती साजरी
By admin | Updated: May 5, 2015 02:50 IST