Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:15 IST

‘घरी रहा आणि सुरक्षित रहा ! नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो’ - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना विषाणू प्रार्दुभावाचे अभूतपूर्व संकट समोर आहे. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. 

गुढी पाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. सरकारकडून या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. त्यामुळे सर्वांनी सरकारला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहनही राज्यपालांनी केले.

गुढी पाडव्याचा मंगल सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. ‘घरी रहा आणि सुरक्षित रहा ! नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो’ अशा शब्दात राज्यपालांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. युगादि, चेती चाँद तसेच संवर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.