Join us
Daily Top 2Weekly Top 5

सण-उत्सव घरात साजरे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 01:55 IST

सण-उत्सव रस्त्यावर साजरे केले जातात. खंडणी वसुली करावी, तशी यासाठी वर्गणी गोळा केली जाते. हे गैर असून, यापेक्षा नागरिकांनी आपल्या घरात सण-उत्सव साजरे करावेत, असे

मुंबई : सण-उत्सव रस्त्यावर साजरे केले जातात. खंडणी वसुली करावी, तशी यासाठी वर्गणी गोळा केली जाते. हे गैर असून, यापेक्षा नागरिकांनी आपल्या घरात सण-उत्सव साजरे करावेत, असे परखड मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले.पुढच्या महिन्यात शिवाजी पार्क मैदानाजवळ रथयात्रा काढण्यासाठी परवानगी मिळावी याकरिता इस्कॉन या संस्थेने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. हे मैदान शांतता क्षेत्र घोषित केल्याने तेथे वर्षातून केवळ तीसच दिवस कार्यक्रमांसाठी परवानगी दिली जाते. मात्र संस्थेला महापालिका व पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे संस्थेने हा अर्ज केला आहे.न्या. विद्यासागर कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. आम्ही रथयात्रेच्या विरोधात नाही, पण मुंबईत बिल्डरांनी मोकळे भूखंड सोडले नाहीत. उत्सव रस्त्यावर साजरे होत आहेत. यासाठी खंडणी वसूल केल्यासारखी वर्गणी गोळा होते, असे परखड मत न्यायालयाने व्यक्त केले. मात्र न्यायालयाने आम्हाला परवानगी दिल्यास आम्ही रथयात्रेची तारीख जाहीर करू, असा युक्तिवाद अर्जदारांनी केला. त्यावर याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका व पोलिसांना दिले व ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. (प्रतिनिधी)