Join us  

दिवाळी घरात साजरी करा नाही तर कोरोना येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2020 3:40 PM

Celebrate Diwali : डिजिटल दिवाळीने आनंद द्विगुणित करा

मुंबई : मुंबई महापालिकेसह मुंबईकरांनी केलेल्या सहकार्यामुळे मुंबईत ब-यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश असल्याचा दावा केला जात आहे. मात्र गणेशोत्सवामधील अनुभव लक्षात घेता दिवाळी सणादरम्यान मुंबईकरांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी घराबाहेर न पडता घरातच दिवाळी साजरी करावी. दिवाळी पहाटसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावे. शक्यतो ऑनलाईन कार्यक्रमांवर भर द्यावा. एकंदर कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने मुंबईकरांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात लगबग वाढली. खरेदी विक्रीचा उत्साहदेखील वाढला आहे. मात्र या सगळ्यात पुन्हा एकदा गर्दीचा माहोल वाढत आहे. नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. परिणामी यंदाची दिवाळी साजरी करताना कोरोनाचे असलेले सावट विसरु नये. उलटपक्षी ज्या प्रमाणे नवरात्रौत्सवादरम्यान सहकार्य केले तसे सहकार्य करावे आणि दिवाळी साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेला दिवाळी सुखाची जावी यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क न वापरण्याबाबत बेफिकीरी दाखविली जात आहे. तसे न करता मास्क वापरण्याबाबत मोहीम  अधिक तीव्र करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे फटाक्यांमध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत विषारी घटक आहेत. ज्यात सल्फर ट्रायऑक्साइड, व्हॅनिडियम पेंटॉक्साइड, पोटॅशियम ऑक्साईड्स आणि कॉपर ऑक्साईड्स आहे. हे सर्व विषारी आहे. ही हानिकारक रसायने हवेत सोडली जातात. त्यामुळे पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात यावी, असे आवाहन आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी केले आहे. दिवाळीत फटाके फोडू नका. कारण फडाके फोडले आणि त्याचा धूर मोठया प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांनासह ज्येष्ठ नागरिकांना मोठया प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी कोरोनाला हरविण्यासाठी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या मिली शेटटी यांनी केले आहे.   

टॅग्स :दिवाळीकोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका