रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी रेल्वेने २१४ विशेष गाड्या घोषित केल्या आहेत. रेल्वेस्थानकांवर भक्तांच्या आरोग्य तपासणीबरोबरच अतिरिक्त तिकीट खिडक्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सुरक्षा यंत्रणा प्रबळ करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. कोकणात गणेशोत्सव लोकप्रिय सण असल्याने मुंबईहून कोकणाकडे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. यावर्षी आतापर्यंत रेल्वेने २१४ विशेष फेऱ्या घोषित केल्या आहेत. त्यामध्ये १३० विशेष आरक्षित व ४६ प्रीमियम आरक्षित फेऱ्यांचा समावेश आहे. अनियोजित प्रवाशांसाठी ३८ अनारक्षित विशेष गाड्या सावंतवाडी-दादर व रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुटणार आहेत. कोकण रेल्वे स्थानकावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोकण रेल्वेच्या आरपीएफ सोबत आरपीएसएफची एक कंपनी लावण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ येथील स्थानकांवर त्वरित वैद्यकीय उपचारासाठी प्राथमिक उपचार कीटही उपलब्ध आहेत. गणेशोत्सवात रत्नागिरी विभागातील प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्या खुल्या राहणार आहेत. सुरक्षेचा एक भाग म्हणून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. तक्रारीसाठी ९००४४७०७०० या मोबाईल क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सुविधा अशा प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडकी सुरक्षा बळास होमगार्ड, स्थानिक पोलिसांची मदत राहणार गाडीची प्रत्यक्ष वेळ जाणून घेण्यासाठी १३९ नंबरवर संपर्क साधण्यासाठी सुविधा रेल्व वेळापत्रकानुसार बसगाड्या सोडण्यासाठी एस. टी.शी चर्चा