Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेरे नॉन अ‍ॅक्टिव्ह

By admin | Updated: November 4, 2014 23:52 IST

ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कल्याण परिमंडळातील रामनगर पोलीस ठाण्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचाअभाव यासारखी महत्त्वाची कारणे समोर येत आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहरातील वाढत्या चेन स्रॅचिंग, भुरट्या चोऱ्या, महिलांवरील अत्याचार यासह अन्य अप्रिय घटनांना चाप बसण्यासाठी भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वीच लोकसहभागातून शहराच्या सुरक्षेसाठी तब्बल ८० सीसी कॅमेरे बसवले होते. मात्र, या स्तुत्य उपक्रमातील कॅमेरे शुभारंभापासून ‘नॉन अ‍ॅक्टिव्ह’ असल्याने ते शोभेचे बाहुले बनल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या निदर्शनास आले आहे. त्यास ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कल्याण परिमंडळातील रामनगर पोलीस ठाण्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचाअभाव यासारखी महत्त्वाची कारणे समोर येत आहेत. परिणामी, सुमारे ८ लाख डोंबिवली-ठाकुर्लीकरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट होत आहे. चार वर्षांपूर्वी या उपक्रमाचा शुभारंभ वर्दळीच्या फडके रोडवरील एका सोहळ्यात तत्कालीन पक्षाध्यक्ष, सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला होता. पोलीस यंत्रणेच्या मार्गदर्शन-सल्ल्यानुसारच हे कॅमेरे शहरभर विविध ठिकाणी बसविण्यात आले होते. तेव्हापासून ते बंदच असल्याने त्यांची देखभालही झालेली नाही. परिणामी, बहुतांशी सर्व कॅमेरे बाद झाले असून त्यांची कार्यक्षमता अन् सुस्पष्टता यासह अन्य तांत्रिक कुशलता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता ते पुन्हा कार्यरत करण्यासाठी नवे कॅमेरे लावणे, अथवा आहे त्याच्यात काही निधी पुन्हा टाकून वापरून ते सुस्थितीत करण्याचा द्राविडीप्राणायाम करावा लागणार आहे. त्यामुळे खर्चाची समस्या असून पुन्हा तेच कॅमेरे अ‍ॅक्टिव्हेट करावे लागतील. या सुविधेचा योग्य तो उपयोग करावा, यासाठी चव्हाण यांच्यासह अनेक दक्ष नागरिकांनी सातत्याने पोलीस यंत्रणेशी पत्रव्यवहार केला. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे हताशपणे सांगण्यात आले.