Join us

सीसी कॅमेऱ्यांचा प्रस्ताव बासनातच!

By admin | Updated: June 16, 2014 03:08 IST

महिला प्रवाशांवरील वाढत्या हल्ल्यांसह छेडछाड आणि डब्यातील चोऱ्यांवर अंकुश मिळवण्याच्या दृष्टीने सीसी कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मध्यसह पश्चिम रेल्वेवर विचाराधीन होता

अनिकेत घमंडी, ठाणेमहिला प्रवाशांवरील वाढत्या हल्ल्यांसह छेडछाड आणि डब्यातील चोऱ्यांवर अंकुश मिळवण्याच्या दृष्टीने सीसी कॅमेऱ्यांचा प्रस्ताव मध्यसह पश्चिम रेल्वेवर विचाराधीन होता. त्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर एका गाडीत सीसी कॅमेरा लावण्यातही आला होता, मात्र धावत्या लोकलमध्ये या कॅमेऱ्याला स्थिरता न मिळाल्याने आवश्यक तेवढे स्पष्ट फूटेज मिळण्यास अडचणी आल्या. परिणामी, अन्य लोकलमध्ये अशा पद्धतीने सीसी कॅमेऱ्यांचा प्रस्ताव बारगळला. मात्र, नुकत्याच झालेल्या मीरा रोडच्या घटनेतून या कॅमेऱ्याची आवश्यकता पुन्हा स्पष्ट झाली. त्यामुळे हा प्रस्ताव सुरक्षा व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे बासनातच गुंडाळल्याची महिलांची टीका आहे. मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटीयन यांनी यासंदर्भातील माहिती मागवली असता त्यांना ही तांत्रिक अडचण समजल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महिलांची वाढती संख्या आणि तुटपुंज्या स्वरूपात मिळणाऱ्या सुविधा यांबाबत उपनगरीय प्रवासी एकता संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महिला सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आता डब्यातील सीसीटीव्हीवर करण्यात येणारा खर्च वाया जाणार असेल तर करण्यात येऊ नये, असे आवाहन करणारे पत्र संघटनेच्या वतीने देऊन त्या जागी अन्य कोणकोणत्या सुरक्षेचे पर्याय देण्यात येतील याची माहिती महिलांकडून मागवल्याचे कोटीयन यांनी सांगितले.