Join us  

सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची सीबीआयला प्रतीक्षा!, सिद्धार्थ, नीरजकडे चौकशी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 6:26 AM

सुशांतच्या मृत्यूचा तपास सर्वोच्च न्यायालयाने १९ आॅगस्टला सीबीआयकडे वर्ग केला. त्यानंतर त्यांच्याकडून सलग तीन आठवडे तपासाचा धडाका कायम होता.

- जमीर काझीमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाला (सीबीआय) सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. त्याला अन्नातून विषबाधा झाली की नाही, हे त्यातून स्पष्ट होणार आहे.व्हिसेराची फेरतपासणी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी अहवाल मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. दरम्यान, सीबीआयकडून सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, त्याचा नोकर नीरज सिंग, केशव आदींची चौकशी सुरूच आहे. त्यांना दररोज पाचारण करण्यात येते.सुशांतच्या मृत्यूचा तपास सर्वोच्च न्यायालयाने १९ आॅगस्टला सीबीआयकडे वर्ग केला. त्यानंतर त्यांच्याकडून सलग तीन आठवडे तपासाचा धडाका कायम होता. शेकडो तास तपास, सर्व संशयितांची कसून चौकशी आणि ५० हून अधिक जणांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले. मात्र ही आत्महत्या नसून त्याची हत्या किंवा त्याला कट करून मारल्याबाबत सबळ पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे अखेरच्या निर्णायक चाचपणीसाठी सुशांतच्या व्हिसेराची पुन्हा तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीहून आलेल्या फॉरेन्सिक लॅबच्या एक्स्पर्टनी घटनास्थळावरून तसेच कूपर रुग्णालयातून सर्व आवश्यक नमुने, सुशांतचा व्हिसेरा ताब्यात घेतला आहे. त्याचा अहवाल तपासण्यासाठी एम्समध्ये फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांचे तपासणी मंडळ बनविले आहे.दरम्यान, या प्रकरणी एनसीबीने सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती व इतरांना अटक केल्यानंतर सीबीआयच्या तपासाची गती काहीशी थंडावल्याचे चित्र आहे. या खटल्याशी संबंधित व एनसीबीकडून अटक न झालेल्यांकडे चौकशी, त्याचा फेरजबाब घेण्याचे काम सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दिशा सालीयनच्या आत्महत्येबाबत चौकशीसुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची माजी मॅनेजर दिशा सालीयन हिने आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतही काहीसा तणावात असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाल्याने त्या प्रकरणाचा सुशांतच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, याचीही पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत