Join us

सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविताना सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST

मुंबई पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासगी ...

मुंबई पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासगी सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच कुठेही काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलीस प्रवक्ते, पोलीस उपायुक्त (अभियान) शहाजी उमाप यांनी केले.

हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये ३० मे रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या वेळी सोसायटीतील एकूण ३९० सभासदांनी लस घेतली. अशा प्रत्येकाने १ हजार २६० रुपये प्रति दराने एकूण ४ लाख ५६ हजार रुपये आयोजकांना दिले होते. लसीकरण झाल्यानंतर सोसायटीतील सदस्यांनी प्रमाणपत्राबाबत मागणी करताच, सदस्यांना तीन वेगवेगळ्या संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर रहिवाशांंनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. झालेल्या लसीकरण घोटाळ्याप्रकरणी अटक सत्र सुरू झाले. धक्कादायक बाब म्हणजे यात ना पालिकेची परवानगी घेतली होती ना डॉक्टरांच्या उपस्थितीत हे लसीकरण घेण्यात आले होते.

शहाजी उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट लसीकरण प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारे मोठ्या सोसायट्या आणि कार्यालयांना खासगी कोविड केंद्रांच्या मदतीने आपल्या आवारात लसीकरण मोहीम राबविण्याची परवानगी महापालिकेने दिली असताना, लसीकरण मोहिमेच्या नावाखाली काही मंडळी वेगवेगळ्या संस्था व रुग्णालय यांच्या नावाचा वापर करून बोगस लसीकरण करून सामान्य नागरिकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे लसीकरण राबविताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

मुंबईत कुठेही अशा प्रकारे बोगस लसीकरण किंवा लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास किंवा कोणत्याही संशयित व्यक्तीची माहिती असल्यास त्याबाबत मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्ष तसेच स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

* पालिकेचे नियम काय सांगतात?

- नोंदणीकृत खाजगी लसीकरण केंद्रामार्फत सोसायटी आणि खासगी कार्यालयांमध्ये लसीकरण केले जाऊ शकते. यासाठी लसीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांबरोबर समन्वय साधण्यासाठी कार्यालय व गृहनिर्माण संस्थेतील वरिष्ठ व्यक्तीची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.

- कर्मचारी, कुटुंबातील सदस्य, सोसायटीतील रहिवासी, घरकाम करणारे, चालक आदी १८ वर्षांवरील सर्व व्यक्ती लस घेऊ शकतील. मात्र यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक असेल. केवळ खासगी कार्यालयात थेट लसीकरणाची परवानगी असेल. त्यांच्या कुटुंबीयांना मात्र काेविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असेल.

- कोविन ॲपवर नोंदणी असलेल्या लसीकरण केंद्रांना खाजगी कार्यालय व गृहनिर्माण सोसायट्यांबरोबर लसीकरणासाठी टाय करता येईल. एक लसीकरण केंद्र अनेक ठिकाणी अशी मोहीम राबवू शकते. मात्र याबाबत स्थानिक आरोग्य अधिकारी व साथरोग नियंत्रण कक्षाला कळविणे आवश्यक असेल.

--------------------------------------