Join us

कमी अंतराच्या विमान प्रवासात खानपान सुविधा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:06 IST

उद्यापासून अंमलबजावणी; हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन तासांहून कमी अंतराच्या विमान प्रवासात आता खानपान ...

उद्यापासून अंमलबजावणी; हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दोन तासांहून कमी अंतराच्या विमान प्रवासात आता खानपान सुविधा मिळणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

खानपान सुविधेचा आस्वाद घेताना प्रवासी मास्क काढून ठेवतात. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता बळावते. शिवाय खाद्यपदार्थांचा पुरवठा करताना विमान कर्मचारी अनेक प्रवाशांच्या संपर्कात येत असल्यामुळे प्रवाशांपासून त्यांना किंवा त्यांच्यापासून प्रवाशांना या विषाणूची बाधा होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

‘दोन तासांपेक्षा कमी अंतराच्या विमान प्रवासासाठी हा निर्णय लागू असेल. अन्य विमानांत खानपान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणतेही नियम नसतील,’ असे हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये यांनी स्पष्ट केले.

लांब पल्ल्याच्या विमानात खानपान सुविधा मिळणार असली तरी त्यासाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. विमान कंपन्या डिस्पोजल प्लेटमध्ये जेवण देऊ शकतील, मात्र पेयपदार्थ बंद स्वरूपात देणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या समोर ओतून देण्यात येणाऱ्या पेयपदार्थांवर बंदी आहे. तसे पदार्थ आधीच डिस्पोजल ग्लासमध्ये भरून प्रवाशांपर्यंत पोहोचवता येतील. प्रत्येक प्रवाशाला सेवा देताना नवीन ग्लोव्हज् वापरण्याची सूचना देण्यात आली आहे.

...............................