Join us

केशरी कार्डधारकांची भूमिका निर्णायक

By admin | Updated: April 17, 2015 00:30 IST

सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात ४२ हजारांहून अधिक झोपडीधारक असून, शहरातील गावठाणे आणि बैठ्या चाळींतही गोरगरीब कुटुंबे राहतात.

नवी मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात ४२ हजारांहून अधिक झोपडीधारक असून, शहरातील गावठाणे आणि बैठ्या चाळींतही गोरगरीब कुटुंबे राहतात. यापैकी सुमारे ८० हजार ते १ लाख केशरी कार्डधारक कुटुंबांना रेशनवरील १५ किलो धान्य गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे या कुटुंबांत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. ते महापालिका निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्डधारकांना त्यांच्या हक्काचे १५ किलो धान्य मिळावे म्हणून काँगे्रस-राष्ट्रवादीने दोन महिन्यांपूर्वी राज्यव्यापी आंदोलन केले होते. नवी मुंबईतून आझाद मैदानावर मोर्चा नेण्यात आला होता. मात्र, अधिवेशन काळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सरकारच्या धोरणामुळे केशरी कार्डधारकांना १५ किलो धान्य देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर त्याविरोधात कोणत्याच पक्षाने आवाज उठवलेला नाही. यात सत्ताधारी शिवसेना-भाजपा सोडाच परंतु काँगे्रस-राष्ट्रवादी या विरोधी पक्षांचाही समावेश आहे. तसेच संपुआ सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा राज्यातील आरंभ नवी मुंबईतील ऐरोली येथील पटनी ग्राउंडवर झाला होता. त्याच शहरातील १ लाख केशरी कार्डधारक कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ सोडाच परंतु, दरमहा मिळणारे १५ किलो धान्यही सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. यात ७ रुपये ३० पैसे दराने ९ किलो गहू आणि ९ रुपये ६० पैसे दराने ६ किलो तांदूळ मिळत होता. यामुळे शंभर ते सव्वाशे रुपयांत या कुटुंबाच्या महिनाभराच्या जेवणाची सोय होत होती. परंतु, सहा महिन्यांपासून हे धान्य न मिळाल्याने गरीब कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. नवी मुंबईत अशी सुमारे एक लाख कुटुंबं असल्याचा अंदाज आहे. हा मुद्दा प्रचारात केवळ झोपडपट्टी भागात तापला आहे. मात्र, त्याची व्याप्ती संपूर्ण शहरात असल्याने या केशरी कार्डधारक कुटुंबाच्या निवडणुकीतील भूमिकेवर सर्वच पक्षांचे यशापयश अवलंबून आहे. (खास प्रतिनिधी)केवळ नवी मुंबईच नव्हेतर राज्यातील सर्वच केशरी कार्डधारक कुटुंबांना रेशनवर मिळणारे १५ किलो अन्नधान्य गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. हक्काचा घास हिसकावून घेतल्यामुळे या कार्डधारक कुटुंबांत तीव्र असंतोष आहे.- शिवाजी जाधव, सदस्य रेशन कृती समिती,नवी मुंबई