Join us  

किल्ले दारादारांत...शिवराय मनामनांत; लहानग्यांनी साकारले मातीचे विविध गडकिल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 1:19 AM

‘किल्ले बनवा स्पर्धे’चा निकाल जाहीर

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील तकीया वार्ड येथील त्रिमूर्ती सेवा मंडळाच्या वतीने ‘किल्ले बनवा स्पर्धा’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. दीपावलीचे औचित्य साधून मंडळाने या वर्षी प्रथमच हा उपक्रम हाती घेतला होता. स्पर्धेमध्ये सुमारे ५० लहान मुलांनी सहभाग नोंदविला होता. बुधवारी या स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची उपस्थिती होती.

शिवशक्ती मित्र मंडळ व साईनाथ सेवा मंडळ यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. दोन्ही मंडळांना रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मकरंद गाढवे आणि कोमल जोशी यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. विजेत्यांना रोख रक्कम तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बाल गोपाळ मित्र मंडळ व निमिता नखाते यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून, त्यांना रोख रक्कम दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला ‘उत्तेजनार्थ’ म्हणून शिवप्रतिमा, प्रमाणपत्र व चॉकलेटचा बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट सादरीकरणालादेखील ३ वेगळी बक्षिसे देण्यात आली.

दरम्यान, सुरेश सावंत यांनी ‘शिव व्याख्याना’तून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच लहानगा अनय मलुष्टे याने ‘पोवाडा’ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेला सुप्रसिद्ध चित्रकार नितीन यादव, आनंद शिंदे, ललीत साळुंखे व इतर इतिहास अभ्यासक परीक्षक म्हणून लाभले होते. शिवशक्ती मित्र मंडळ व साईनाथ सेवा मंडळ यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. दोन्ही मंडळांना रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज