Join us  

मतदान केल्याचा पुरावा दिल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 4:24 AM

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान केले पाहिजे, असे आवाहन करत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबाबले जात आहेत.

मनोहर कुंभेजकर मुंबई : मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांत चुरशीची लढत होत आहे. सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे एकीकडे राजकीय पक्षांमध्ये धाकधूक वाढली असताना, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक संस्था सरसावल्या आहेत. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान केले पाहिजे, असे आवाहन करत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबाबले जात आहेत. दरम्यान, मतदान केल्याचा पुरावा सादर केल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत देण्याचा निर्णय कांदिवली येथील सोसायटीने घेतला आहे.

कांदिवली येथील धीरज सोसायटीने मतदान केल्याचा पुरावा सादर केल्यावर येथील १५० सदनिकाधारक रहिवाशांना मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर गोरेगाव पूर्व दिंडोशी येथील डॉ. शेनॉय यांनी मतदान केल्याचा पुरावा दाखवल्यावर मोफत ब्लडप्रेशर व ब्लडशुगर चाचणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तर चक्क हवाई सुंदरींनीसुद्धा विमान प्रवासात मतदान करण्याचे आवाहन प्रवाशांना केल्याचे विमान प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका तरुणाने सांगितले.

मतदान करणारच, यासाठी दिली शपथउपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी तरुणाईने मतदान करावे यासाठी ‘स्पोर्ट फॉर व्होट’अंतर्गत सांताक्रूझ येथील लायन्स क्लब महापालिका मैदानावर टेनिस क्रिकेट मॅच आयोजित केली होती. या वेळी विजेत्या संघाच्या कर्णधाराने सर्व खेळाडूंना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान करणारच, अशी शपथ दिल्याची माहिती पालिकेचे विशेष प्रकल्प अधिकारी सुभाष दळवी यांनी दिली. तर आम्ही इतरांनादेखील मतदान करण्यासाठी प्रेरित करू, असे आश्वासन या सर्व खेळाडूंनी दिल्याची माहितीही दळवी यांनी दिली.परदेशी गेलेले नागरिकसुद्धा मतदान करण्यासाठी मुंबईत परतत आहेत. ऑस्ट्रेलियावरून खास विनेश सलोनी हे रविवारी रात्री विमानाने मुंबईत कांदिवली येथे परतले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमतदान