Join us

अपघातात मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: June 25, 2015 00:34 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि धोकादायक परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या अपघातांत जीवितहानी झाल्यास आणि त्यास रस्त्यांची

अलिबाग : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि धोकादायक परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या अपघातांत जीवितहानी झाल्यास आणि त्यास रस्त्यांची दुरवस्था कारणीभूत असल्यास संबंधित बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा निर्णय रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी घेतला आहे. याच्या अंमलबजावणीकरिता त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांना आदेश दिले आहेत.रायगड जिल्हाधिकारीपदी विराजमान झाल्यावर मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. कोकणात गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण असतो. त्या निमित्ताने जिल्ह्यातील पळस्पे (पनवेल) ते कशेडी (पोलादपूर) या गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या टप्प्यातून कोकणातील लाखो चाकरमानी आपल्या गावी जातात. गेल्या दहा वर्षांपासून या महामार्गाच्या दुरवस्थेमुळे तर अलीकडच्या चार वर्षांत महामार्ग रुंदीकरणाच्या अपुऱ्या कामांमुळे जीवघेणी परिस्थिती निर्माण होत आहे. वाहन अपघातांत मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे, ही परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर उगले यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.वाळू धोरणासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असून सप्टेंबरमध्ये वाळूचा लिलाव होईल. तसेच गौणखनिज उत्खनन पट्ट्यांची ई.टी.एस. मशिनद्वारे मोजणी व अनधिकृत उत्खननाबद्दल सत्वर कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दंडाच्या संदर्भात पाचपट दंड आकारणी तसेच मशिनरी व गाड्या जप्तीची कार्यवाहीबाबत शासनाकडून चांगला निर्णय झाला असल्याने महसुली यंत्रणा अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने देखील ‘की रिझल्ट एरिया’ कार्यपद्धती स्वीकारली असून त्यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्याांनी सांगितले.