Join us
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना संसर्ग राेखा; याेग्य काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:06 IST

पालिका प्रशासन; गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्या रहिवासी इमारतीत पाचपेक्षा कमी ...

पालिका प्रशासन; गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्या रहिवासी इमारतीत पाचपेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण आहेत, तिथे संबंधित रुग्ण असलेला मजला प्रतिबंधित (सील) केला जात असून, पाचपेक्षा अधिक रुग्ण असल्यास संपूर्ण निवासी इमारत प्रतिबंधित केली जाते. प्रतिबंधित मजले तसेच इमारतीमधील बाधित रुग्ण, त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती तसेच संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले.

मागील दोन महिन्यांतील एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे ९० टक्के रुग्ण रहिवासी इमारतींमधील आहेत. परिणामी प्रतिबंधित निवासी इमारतींमध्ये उपाययोजना आणखी कठोर केल्या गेल्या आहेत. घरच्या घरी केल्या जाणाऱ्या विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. नियम मोडणाऱ्यांची माहिती गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरातील रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वतंत्र खोली आणि प्रसाधनगृहांचा वापर करणे आवश्यक आहे. तशी सोय नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रांमध्ये हलविण्यात येत आहे.

दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्या यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित निवासी इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत. दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्यांमध्ये रहिवासी इमारतींमधील रुग्णसंख्या तुलनेने जास्त असल्याने अशा निवासी इमारतींमध्ये नियम मोडलेले आढळल्यास सक्त कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.

* सूचना फलकावर माहिती देणे बंधनकारक

ज्या निवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण आहेत, अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये सूचना फलकांवर संबंधित घराचा आणि मजल्याचा क्रमांक दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

* मोलकरणींची चाचणी,

बाधित रुग्ण संख्या अधिक आढळलेल्या रहिवासी इमारतींमधील मोलकरीण, मजूर, वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांची चाचणी करण्यात येत आहे.

* विषाणूची साखळी तोडण्यावर भर

रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची, त्यांच्यात लक्षणे आढळली नाहीत तरीही संपर्कात आल्यापासून सातव्या दिवशी चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संस्थात्मक अथवा गृह विलगीकरण करून विषाणूची साखळी तोडण्यावर पालिका प्रशासनाकडून भर दिला जात आहे.

............................